Join us  

हिरव्या मुगाचे करा ३ चविष्ट पदार्थ; ब्रेकफास्ट होईल झकास, सकाळी आवश्यक प्रोटीन डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 4:56 PM

शरीराला आवश्यक असणारे अनेक उत्तम गुणधर्म असलेले मूग आवर्जून खायला हवेत...

ठळक मुद्दे पावसाळा काही दिवसांवर आल्याने बाहेर मुसळधार पाऊस पडला की आपल्याला गरमागरम आणि कुरकुरीत काहीतरी खायला हवे असते अशावेळी ही भजी उत्तम पर्याय आहेमिसळ तर आपल्यातील अनेकांचा ऑल टाइम फेवरिट पदार्थ, मूगाची मिसळ ट्राय तर करुन बघा

रोज सकाळी नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न आपल्यासमोर कायमच असतो. पोहे, उपीट सोडून घाईच्या वेळी सारखं वेगळं काय करणार? त्यातही आपण केलेला पदार्थ पौष्टीक आणि चविष्ट असा दोन्ही असला तरच तो घरातील मंडळी खातात. हिरवे मूग हा त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रोटीननी युक्त असलेल्या हिरव्या मूगापासून एक से एक रेसिपी करता येतात. हिरव्या मुगात फेनोलिक अॅसिड, अमीनो अॅसिड, कार्बोहायड्रेट, लिपीड, अँटीऑक्सिडंटस, अँटीबायोटीक आणि अँटीइनफ्लमेटरी गुण असतात. हिरव्या मूगाचे नियमितपणे सेवन केल्यास हृदयरोग, मधुमेह यांसारखे आजार दूर राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये फोलेटचे प्रमाण जास्त असल्याने गर्भवती स्त्रियांना हिरवे मूग खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या मूगाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात, रक्ताची कमतरता भरुन निघते. तसेच पचनक्रिया सुरळीत होऊन ताण कमी होण्यासही हिरवे मूग खाणे फायद्याचे ठरते. 

मूगाचे डोसे किंवा आप्पे 

१. हिरवे मूग रात्रभर भिजवून ठेवा. शक्य असेल तर मोड आणले तरी चालतील त्यामुळे कडधान्य पचायला आणखी हलके होते.

२. सकाळी पाणी काढून मूगामध्ये आलं, मिरची, लसूण आणि मीठ घालून मिक्सर करा.

३. आप्पे करणार असाल तर पीठ घट्टसर ठेवा आणि डोसे करायचे असतील तर थोडे पातळ केले तरी चालेल. 

४. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, किसलेले गाजर, बीट, कोबी असे घालू शकता. भाज्यांमुळे पौष्टीकता वाढत असल्याने मुलं भाज्या खात नसतील तर अशाप्रकारे भाज्या देणे हा उत्तम पर्याय आहे.

५. सकाळच्या घाईत सॉससोबत हे गरमागरम डोसे किंवा आप्पे अतिशय उत्तम लागतात. तवा तापलेला असेल तर डोसे होतातही पटापट. 

(Image : Google)

२. मूगाची भजी 

१. तळलेले पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतात. त्यातही पावसाळा काही दिवसांवर आल्याने बाहेर मुसळधार पाऊस पडला की आपल्याला गरमागरम आणि कुरकुरीत काहीतरी खायला हवे असते अशावेळी ही भजी उत्तम पर्याय आहे. 

२. भिजवलेले मूग मिक्सरमधून वाटून घ्या.

३. त्यामध्ये लसूण, जीरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला.

४. हे वाटण बारीक केलेल्या मूगामध्ये घालून त्यावर लिंबू पिळा. चवीपुरते साखर आणि मीठ घाला. 

५. हे पीठ घट्टसर करुन त्याची गोल लहान आकाराची भजी बारीक गॅसवर तळा.

६. सकाळी किंवा संध्याकाळी चहा-कॉफीसोबत ही गरमागरम भजी अतिशय चविष्ट लागतात. 

(Image : Google)

मूगाची मिसळ

१. आपण नेहमी मटकीची किंवा मिक्स कडधान्यांची मिसळ करतो. मूगाची उसळ आपण पोळी किंवा भाकरीसोबत जेवणासाठी करतो. पण सकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून रोज काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर मुगाची मिसळ हा मस्त पर्याय आहे. 

२. आलं-मिरची-लसूण आणि ओलं नारळ यांचं वाटण करुन मूगाची चांगली चविष्ट उसळ करुन घ्यावी. 

३. यात थोडा गोडा मसाला, धने-जीरे पावडर, लहान गुळाचा खडा आणि मीठ घालून ती चांगली उकळू द्यावी.

४. उसळ एका बाऊलमध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेले कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि फरसाण घालावे.  

५. आवडत असल्यास या उसळीत दाणेही घालू शकतो, त्यामुळे पौष्टीकता आणखी वाढण्यास मदत होते. उसळीला थोडा रस्सा ठेवल्यास मिसळीसारखी गरमागरम खायला छान वाटते. लिंबू पिळल्यास त्याचा स्वाद आणखी वाढतो.

(Image : Google)

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.