Join us  

विकतसारखी कोरडी खुटखुटीत आवळा कॅंडी करा घरच्याघरी; पांढरीशुभ्र कॅण्डी करण्याची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 2:07 PM

तब्येतीसाठी उपयुक्त आवळा कँडी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार केली तर...

ठळक मुद्देपाकात आवळ्याचा अर्क उतरलेला असल्याने तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो.  पाकातून मुरलेला आवळा बाहेर काढून तो सुकवायचा. मात्र तो उन्हात सुकवू नये त्यामुळे तो चिवट होतो.

आवळा हा आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम औषध आहे हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही आपल्याकडून म्हणावा तितका हा पदार्थ नियमित खाल्ला जात नाही. आवळा हा पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे, यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आवळ्यातील गुणधर्म तणावापासून दूर राहण्यास मदत करतात. तसेच केस आणि त्वचेसाठीही आवळा आवर्जून खाल्ला जातो. चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. पूर्वी शाळेच्या बाहेर आवळा खाल्ला जायचा पण आता ते प्रमाण कमी झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून आवळा खायला हवा. 

(Image : Google)

आवळ्याचे पांढरे आवळे आणि रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला विशेष महत्त्व असून त्याचे बरेच फायदेही सांगितले आहेत. उन्हाळ्यात होणारे आम्लपित्त, लघवी साफ न होणे, पचनाच्या किंवा पोटाच्या तक्रारींवर आवळा कँडी खाणे फायदेशीर असते. तसेच याच्या सेवनाने उन्हामुळे होणारी मळमळ कमी होते, तरतरी येते. आवळ्याचे मोरावळा, सरबत, लोणचे, कँडी, सुपारी असे बरेच प्रकार होतात. सध्या धकाधकीचे जीवन असल्याने आपल्यातील अनेक जण बाजारात रेडीमेड मिळणारे पदार्थ घेणे पसंत करतात. पण घरीही अगदी विकतच्यासारखी आवळा कँडी सहज करता येते. पाहूयात आवळा कँडीची रेसिपी... 

साहित्य - 

१. आवळा - अर्धा किलो२. साखर - अर्धा किलो 

कृती 

१. मोठ्या आकाराचे आवळे घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावेत.२. हे आवळे आहेत तसेच न चिरता कुकरला २ शिट्ट्या करुन वाफवून घ्यावे.३. शिजवल्यावर आवळ्याच्या फोडी होतात. त्यातील बिया काढून फोडी एका भांड्यात घ्याव्यात.४. आवळ्याच्या फोडी थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धा किलो साखर घालावी.५. तीन दिवस हे मिश्रण तसेच ठेवायचे, मात्र दिवसातून दोन वेळा ते हलवायचे म्हणजे खराब होत नाही.

(Image : Google)

६. तीन दिवसांनी या साखरेचा पाक होऊन त्यात आवळा अतिशय चांगला मुरतो. ७. पाकातून मुरलेला आवळा बाहेर काढून तो सुकवायचा. मात्र तो उन्हात सुकवू नये त्यामुळे तो चिवट होतो. तर घरात सावलीत कुठेही तो वाऱ्याने सुकतो. ८. अशारितीने पौष्टीक आवळा कँडी अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी तयार करु शकतो. मात्र याला कुठेही पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची. पाण्याने आवळ्याला बुरशी लागायची शक्यता असते. ९. खाली उरलेला पाक टाकून न देता तो सरबत करण्यासाठी वापरु शकतो. या पाकात आवळ्याचा अर्क उतरलेला असल्याने तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.