विकेंड जवळ आला की आपल्यला चमचमीत खाण्याची इच्छा होते. सध्या कोबीचा सीजन सुरु आहे. आपण कोबीपासून अनेक पदार्थ बनवतो. काही लहान मुलांना कोबीची भाजी आवडत नाही. त्यांच्यासाठी या विकेंडला खास हॉटेलस्टाईल घरच्या घरी मंचुरियन बनवू शकता. आजकालच्या मुलांना मंचुरियन फार आवडतात. चायनीज लहानग्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.
चायनीजमधील मुख्य पदार्थ मंचुरियन हा खूप फेमस आहे. मंचुरियन चवीला उत्तम व कुरकुरीत लागतात. घरी बनवत असताना हॉटेलची चव मंचुरियनला येत नाही. काही मंचुरियन कुरकुरीत नसून मऊ पडतात, तर काहींचे मंचुरियन कडक बनतात. मंचुरियन बनवणे सोपे जरी वाटत असले तरी बनवणे अवघड आहे. योग्य प्रमाणात सामान, यासह बनवण्याची पद्धत माहित असणे गरजेचं. आपल्याला झटपट मंचुरियन बनवायचे असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी..
मंचुरियन बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बारीक चिरलेली कोबी
किसलेले गाजर
बारीक चिरलेली ढोबळी मिरची
बारीक चिरलेला लसूण
बारीक चिरलेलं आलं
मैदा
कोर्न फ्लोर
तेल
पाणी
चिरलेला कांदा
हिरव्या मिरच्या
काळी मिरी पावडर
१ चमचा सोया सॉस
१ चमचा लाल तिखट
१ चमचा टोमॅटो केचअप
चवीनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या वाटीत सर्व बारीक चिरलेले साहित्य म्हणजे कोबी, गाजर, ढोबळीमिरची, लसूण, आले, हिरवी मिरची घालून मिक्स करा. भाज्या मिक्स झाल्यानंतर त्यात मिरपूड टाका. आता मैदा, मका पीठ, चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिश्रण मिक्स करा.
भाज्यांना पाणी सुटते, त्यामुळे गरज असल्यावरच थोडे पाणी घाला. संपूर्ण मिश्रण पीठाप्रमाणे चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे - छोटे गोळे करून घ्या.
कढईत तेल गरम करा आणि त्यात मंचूरियन गोळे तळून घ्या. साधारण २-३ मिनिटे तळल्यावर त्यावर छान तपकिरी रंग येईल. मंचूरियनला चांगले गोल्डन - ब्राऊन रंग येऊपर्यंत तळून घ्या. तळलेले मंचूरियन गोळे एका डिशमध्ये काढून घ्या. आता एका भांड्यात मका पीठ घ्या आणि त्यात पाणी घाला व मिक्स करा आणि बाजूला ठेवा.
दुसरीकडे, कढईत तेल गरम करा. त्यात लसूण टाका, लसूण ब्राऊन झाल्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून थोडे भाजून घ्या. त्यानंतर आलं, हिरवी मिरची, मिरपूड, सोया सॉस, लाल तिखट, टोमॅटो केचअप आणि मीठ टाकून संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात कोर्न फ्लोर आणि पाणी मिक्स केलेले मिश्रण टाका. सुमारे २ मिनिटे शिजवा यामध्ये तयार मंचूरियन गोळे घाला आणि नीट ढवळून घ्या. ३-४ मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा. अशा प्रकारे मंचूरियन तयार, सर्व्ह करताना कांद्याने सजवा.