सकाळी एकदा स्वयंपाक केला की संध्याकाळी आपण ऑफीसमधून आल्यावर थकलेलो असतो. अशावेळी झटपट आणि तरीही सगळ्यांना आवडणारे काहीतरी करावे लागते. अशावेळी कधी आमटी, कधी कोशिंबीर, कधी आणखी काही करुन आपण वेळ मारुन नेतो खरी. पण रोज रोज असे केले की घरातील मंडळी आपल्यावर वैतागतात. अशावेळी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या पनीरची छानशी रेसिपी केली तर. पनीरमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी पौष्टीक तर असतेच शिवाय उन्हाळ्यात भाज्या महाग असल्याने आणि पटकन वाळून जात असल्याने पनीर हा भाजीसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
आता पनीर म्हटल्यावर तुम्हाला पनीर मसाला किंवा मटार पनीरची भाजी वाटेल. पण आज आपण पनीरची ढाबा स्टाईल भुर्जी कशी करतात ते पाहणार आहोत. आपल्याला बाहेरचे सगळे पदार्थ अतिशय आवडतात. बाहेर गेलो की आपण ते चवीचवीने खातोही. मग तसेच पदार्थ आपण घरी केले तर. चला तर बघूया घरच्या घरी झटपट होणारी ही पनीर भुर्जी (Paneer bhurji ) कशी करायची? रात्रीचे जेवण पौष्टीक तर होईलच पण घरातले सगळेच त्यामुळे तुमच्यावर नक्की खूश होतील.
साहित्य -
१. पनीर - पाव किलो
२. कांदा - १
३. टोम्रटो - १
४. आलं - एक इंच तुकडा
५. मीठ - चवीनुसार
६. बेसन - अर्धी वाटी
७. हळद - अर्धा चमचा
८. तिखट - अर्धा चमचा
९. धने पावडर - अर्धा चमचा
१०. आमचूर पावडर - अर्धा चमचा
११. तेल - २ चमचे
१२. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. पनीरचा बारीक चुरा करुन घ्यायचा.
२. कढईत तेल घालून त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर आणि आमचूर पावडर घालायची. हे सगळे तेलात एकजीव झाले की त्यामध्ये बेसन घालून त्याचा चांगला मसाला तयार करुन घ्यायचा.
३. हे सगळे एका ताटलीत काढून ठेवायचे आणि पुन्हा कढईमध्ये थोडे तेल घालायचे.
४. तेल तापले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा.
५. त्यानंतर यामध्ये आलं आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचा.
६. मग यामध्ये बेसनाचा तयार केलेला मसाला घालायचा आणि सगळे चांगले एकजीव करायचे.
७. बारीक केलेले पनीर यामध्ये घालून आवश्यकतेनुसार थोडे पाणी आणि मीठ घालायचे.
८. एक वाफ आली की गॅस बंद करायचा आणि त्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
९. ही भुर्जी गरम पोळ्या, फुलके, पुऱ्या कशासोबतही छान लागते.