दिवाळी म्हटली की गोडधोड तर आलेच. दिवाळी पाडवा आणि भाऊबिज तर जोरदार व्हायलाच हवी ना. वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणाचा सेलिब्रेशन करताना फराळ, नातेवाईक किंवा मित्र-मंडळींची सोबत आणि गोडाधोडाचे जेवण तर व्हायलाच हवे. मग पाहुणे येणार असतील की तेच ते गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळे आणि सगळ्यांना आवडेल, चालेल असे काय करता येईल याचा विचार करता करता घरातील महिला पार हैराण होतात. तर घरच्या घरी अगदी झटपट करता येईल अशी अंगुर मलाईची रेसिपी आपण आज पाहणार आहोत. अंगुर मलाई म्हणजे अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. दूध आणि दुधाचे पदार्थ आवडणाऱ्यांसाठी ही अंगुर मलाई म्हणजे तर मेजवानीच. अनेकदा आरण अंगुर मलाई आपण बाहेरुन आणतो. पण वाढती महागाई, भेसळीची भिती यांमुळे आपण पाडवा किंवा भाऊबिजेच्या मुहूर्तावर ही अंगुर मलाई घरच्या घरी केली तर? पाहूया अंगुर मलाईची सहज आणि सोपी रेसिपी...
साहित्य -
१. व्हिनेगर - एक डाव
२. दूध - ३.५ लिटर
३. साखर - तीन वा्ट्या
४. पिस्ता आणि बदाम - आवडीनुसार
५. केसर - ५ ते ६ काड्या
६. वेलची पावडर - पाव चमचा
कृती -
१. मोठ्या गॅसवर दोन लिटर दूध पूर्ण गरम करुन घ्या. या दुधाला साय येऊ न देता ते हलवत राहा. दूध पूर्ण उकळल्यावर गॅस बंद करा. ५ मिनिट थोडेसे थंड झाल्यावर यात एक डाव व्हिनेगर घाला. दूध फाटण्यास सुरुवात होईल. इतक्या व्हिनेगरनेही दूध फाटले नाही तर आणखी थोडे व्हिनेगर घाला. यानंतर पाणी आणि दूधाचा घट्ट भाग (पनीर) वेगळे झालेले आपल्याला दिसेल.
२. एक मोठी गाळणी घेऊन त्यावर एक कॉटनचे कापड ठेवा आणि हे फाटलेले दूध गाळून घ्या. हे दूधाचे पाणी फेकून न देता ते भात किंवा भाजीसाठी वापरु शकता. कापडातील पनीरमध्ये थोडे पाणी घालून पुन्हा गाळून घ्या आणि कापडातून पनीरमधील पाणी काढून घ्या...
३. यानंतर हे पनीरवर काहीतरी वजन ठेऊन अर्धा तास कापडात तसेच ठेऊन द्या. यामुळे अंगुर मलाईचे गोळे मऊ आणि लुसलुशीत होण्यास मदत होईल.
४. हे पनीर एका मोठ्या ताटात काढून घ्या, त्यानंतर त्यात एक चमचा मैदा किंवा इतर तुम्हाला हवे ते पीठ घाला. नंतर हे मिश्रण कणीक मळतो त्या पद्धतीने चांगल्यारितीने मळून घ्या. ३ ते चार मिनिटे हे पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या.
५. याचा एक छोटा गोळा करुन पाहा. जर या गोळ्याला चिरा पडत असतील तर आणखी मळण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या आणि मिश्रण आणखी मळा. त्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकाराचे एकसारखे गोळे करुन घ्या.
६. कढईत दिड वाटी पाणी आणि सहा वाटी पाणी घेऊन पाक बनवून घ्या. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहा. उकळेपर्यंत यावर झाकण ठेवा. पूर्ण उकळी आल्यावर पनीरचे गोळे यामध्ये घाला आणि पुन्हा झाकण ठेवा. गॅस लहान करुन ५ मिनिटे हे गोळे साखरेच्या पाकात थोडेसे शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण गार होऊ द्या.
७. आता रबडी तयार करण्यासाठी दिड लिटर गाईचे दूध घेऊन ते ५ मिनिटे मोठ्या गॅसवर चांगले उकळून घ्या. यामध्ये केसराच्या ३ ते ४ काड्या घाला. यात तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढी साखर घाला. हे दूध घट्ट होईपर्यंत उकळत राहा. आवडत असेल तर या रबडीमध्ये वेलची पावडर घाला.
८. आता पाकातील गोळे एका बाऊलमध्ये घेऊन त्यावर ही रबडी घाला आणि त्यावर पिस्ता आणि बदामाचे काप, केशर घाला.