मस्त कैरीचा सिझन आहे. पुन्हा वर्षभर ताजी कैरी खाता येणार नाही, त्यामुळे मस्त कैरीचे पदार्थ करा आणि मनसोक्त खाऊन घ्या.(Make instant onion-raw mango pickle at home) कैरी कांद्याचे हे झटपट लोणचे फारच स्वादिष्ट लागते. करायला फक्त दहा मिनिटे लागतात. रेसिपी अगदी सोपी आहे, पाहा काय कराल.
साहित्य
कांदा, कैरी, तेल, मीठ, हळद, मोहरी, हिरवी मिरची, बडीशेप, कांद्याच्या बिया, हिंग, लाल तिखट, कोथिंबीर
कृती
१. कांद्याची सालं काढून कांदा लांब-लांब चिरुन घ्या.(Make instant onion-raw mango pickle at home) पातळ काप करा. कांद्या प्रमाणेच कैरीचेही लांब-लांब पातळ तुकडे चिरुन घ्या. कैरी किसून घेतली तरी चालेल. एक कैरी घेतली तर एक कांदा घ्या. म्हणजे चव संतुलित राहते.
२. एका कढई किंवा पॅनमध्ये बडीशेप परतून घ्या. त्यामध्ये पाणी तेल काहीही घालू नका. सुकीच परता. जरा कुरकुरीत झाली की त्यामध्ये कांद्याच्या बिया घाला. अगदी मिनिटभर परता आणि गॅस बंद करा.
३. बडीशेप व कांद्याच्या बिया गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. मस्त सरसरीत पूड करुन घ्या. मोकळी पूड तयार करा. सगळे बारीक वाटले जाईल आणि लगदाही होणार नाही याची काळजी घ्या.
४. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्या. कोथिंबीरही छान बारीक चिरून घ्या.
५. एका परातीमध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये चिरलेला कांदा घ्या. त्यामध्ये कैरी घाला. चवीपुरते मीठ घाला. तसेच हळद घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तयार केलेली बडीशेप व कांद्याच्या बियांची पूड घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळं छान एकजीव करुन घ्या.
६. एका कढईमध्ये किंवा फोडणी पात्रामध्ये थोडे तेल घ्या. त्यामध्ये भरपूर मोहरीचे दाणे घाला. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिंग घाला. गॅस बंद केल्यावर लाल तिखट घाला. तयार फोडणी कैरी व कांद्याच्या मिश्रणावर टाका. सगळं छान एकजीव करुन घ्या. मस्त लाल, हिरवा, पिवळा असा रंग त्या लोणच्याला येतो. पोळी, भात, भाकरी सगळ्याबरोबर हे लोणचे छान लागते.