भारताच्या कोणत्याही भागात गेलात तरी भात किंवा तांदूळ हा मुख्य पदार्थ म्हणून ओळखला जातो. सणासुदीचे किंवा नैवेद्याचे ताट वरण-भाताशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कोणत्याही भाजी-उसळीबरोबर किंवा साजूक तूप मेतकूटाबरोबर, मुगाच्या डाळीची-तांदुळाची खिचडी, भाज्या घालून मसाले भात म्हणून, पिठले किंवा कोणत्याही डाळीसोबत, आपण हा भात कसाही आणि कश्याबरोबरही अगदी सहज खाऊ शकतो. आपल्याकडे घराघरात एक गोष्ट आवर्जून केली जाते, ती म्हणजे अन्नाची नासाडी न होऊ देणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरलेल्या भातापासून तयार केलेला फोडणीचा भात. हा भात प्रत्येकाला आवडतो आणि चटकन संपतो. कमीत कमी साहित्य वापरून केलेला हा फोडणीचा भात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. परंतु जर रोज तोच फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन काय करता येऊ शकत? फोडणीच्या भाताला पर्याय म्हणून असलेला खमंग लेमन राईस कसा तयार करायचा याची एक नवीन रेसिपी समजून घेऊयात(Lemon Rice Recipe).
thespicystory या इन्स्टाग्राम पेजवरून लेमन राईस कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करण्यात आली आहे.
साहित्य -
१. तिळाचं तेल किंवा व्हेजिटेबल ऑइल - १ टेबलस्पून २. शेंगदाणे - १/४ कप३. काजू - ६ ते ७ ४. राई - १ टेबलस्पून ५. सफेद उडद डाळ - १ टेबलस्पून६. चणा डाळ - १ टेबलस्पून७. लाल सुकी मिरची - ३ ते ४ ८. हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक चिरलेली)९. शिजवून घेतलेला भात - ३ कप १०. कढीपत्ता - ६ ते ७ पान ११. हळद - १ टेबलस्पून१२. लिंबाचा रस - २ टेबलस्पून१३. मीठ - चवीनुसार
कृती -
१. एका कढईत तेल घेऊन त्यात काजू व शेंगदाणे हलकेच तळून घ्या. २. फोडणीसाठी तेल घेऊन त्यात राई, सफेद उडद डाळ, चणा डाळ, लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता यांची फोडणी द्या. ३. त्यानंतर हळद व शिजवलेला भात घालून हा भात परतून घ्या. ४. सगळ्यात शेवटी तळलेले काजू व शेंगदाणे घालून त्यावर लिंबाचा रस सोडा.
फोडणीच्या भाताला पर्याय म्हणून असलेला खमंग लेमन राईस तयार आहे.