Join us  

मिक्स व्हेज भाजी नेहमीच खाता, करा मिक्स व्हेज पराठा.. नाश्त्याला खा हेल्दी आणि टेस्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 4:23 PM

करा मिक्स व्हेज पराठा.. नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय

ठळक मुद्देमिक्स व्हेज पराठ्यासाठीच्या भाज्यांचं मिश्रण जास्त शिजवू नये. 

नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी असा पर्याय हवा असल्यास अवश्य पराठे करावेत. पराठे खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं जरी म्हटलं जात असलं तरी आपण पराठे कसे करतो यावर पराठ्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम अवलंबून असतात.  पराठे करताना पारीसाठी, सारणासाठी काय सामग्री वापरतो यावर पराठ्यांची पौष्टिकता अवलंबून असते. पराठे हे पौष्टिक आणि चविष्ट करायचे असतील तर पराठ्यांसाठीच्या पारीसाठी मैदा न वापरता कणिक आणि रव्याचा वापर करावा. यामुळे पराठे खरपूस होतात.  पीठ भिजवताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास पराठे पौष्टिक तर होतातच शिवाय ते टिकतातही जास्त. पराठ्यांसाठी पीठ भिजवताना निम्मं पाणी आणि निम्मं दूध वापरलं तरी चालतं. पराठ्याचं सारण करताना विविध भाज्यांचा वापर केल्यास आणि पराठे शेकताना तेला तुपाचा वापर कमी केल्यास असे पराठे हे आरोग्यदायी  ( healthy paratha) तर ठरतातच शिवाय या पराठ्यांमुळे वजनही ( paratha for weight loss) कमी होतं. 

Image: Google

मिक्स व्हेज ही भाजी घरी केलेली असू देत नाहीतर हाॅटेलातली ती आवडतेच. पराठ्यांमध्येही मिक्स व्हेज पराठा ( mix veg paratha) केल्यास चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतं. मिक्स व्हेज पराठा  ( how to make mix veg paratha) करायला अतिशय सुलभ आणि चवीला उत्तम आहे.

Image: Google

मिक्स व्हेज पराठा कसा करावा?

मिक्स व्हेज पराठा करण्यासाठी 2 वाट्या कणिक, 1 उकडलेला बटाटा, अर्धा कप फ्लाॅवर किसून घेतलेला, पाव कप मटार, पाव कप सिमला मिरची बारीक चिरलेली, पाव कप किसलेलं गाजर, पाव कप किसलेला कोबी, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 

Image: Google

मिक्स व्हेज पराठा करताना पीठ चाळून घ्यावं. त्यात थोडं मीठ आणि 1 चमचा तेल घालून पीठ मळून घ्यावं. कणिक सुती कापडानं झाकून ठेवून 15-20 मिनिटं मुरु द्यावी. उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यावा. भाज्या किसून घ्यावा. किसलेल्या भाज्यात मटार घालावेत. कढईत थोडं तेल गरम करावं. त्यात भाज्यांचं मिश्रण घालून ते 2-3 मिनिटं परतावं. भाज्या परतल्या गेल्या की त्यात हळद, आमचूर पावडर, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट आणि थोडं मीठ घालावं. मिश्रण नीट एकत्र करुन परतलं की गॅस बंद करावा. भाज्या जास्त शिजू देवू नये. सारण गार झालं की पराठे करायला घ्यावेत. कणकेच्या छोट्या लाट्या घेऊन त्याच्या दोन पाऱ्या कराव्यात. एका पारीवर सारण भरुन दुसरी पारी त्यावर ठेवून पारीचे काठ बंद करुन पराठा हलक्या हातानं लाटावा. किंवा एकच लाटी थोडी मोठी करुन त्यात मोदकाप्रमाणे सारण भरुन ती पारी पिठावर हलक्या हातानं लाटूनही पराठा करता येतो.   गरम तव्यावर थोड्या तेला/ तुपाचा वापर करत पराठे खरपूस शेकून घ्यावेत. दही किंवा चटणी यासोबत मिक्स व्हेज पराठा छान लागतो. पोटभरीचा होतो, चविष्ट लागतो आणि आरोग्यास लाभदायी ठरतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीआहार योजना