- राजश्री शिन्दोरे
यंदाच्या नारळी पौर्णिमा अगदी दोन दिवसांवर आली आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ करण्याला महत्त्व.यंदाच्या नारळी पौर्णिमेला नारळाचे काय विशेष पदार्थ करायचे याचा विचार प्रत्येकीच्या मनात सुरु असेल. नेहेमीपेक्षा नारळाचे काही वेगळे पदार्थ करता येतील का? याचा शोधही सुरु असेल. तर या वेगळ्याच्या शोधाचे उत्तर देणारे तीन पर्याय आहेत. सोपे, सहज पण वेगळे. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पदार्थ आवडायला हवेत याचा विचार केलेला आहे. हे ओल्या नारळाचे विशिष्ट पदार्थ करुन यंदाच्या नारळी पौर्णिमेला करा गोड आणि स्पेशल.
थ्री इन वन नारळाची बर्फी
छायाचित्र- गुगल
ही बर्फी करण्यासाठी 250 ग्रॅम खवा, 250 ग्रॅम साखर, 2 वाटी ओल्या नारळाचा चव, 2 मोठे चमचे कोको पावडर, अर्धा छोटा चमचा स्ट्रॉबेरी इसेन्स आणि रंग, वेलची पूड, 1 मोठा चमचा तूप आणि चांदीचा वर्ख हे साहित्य घ्यावं.
बर्फी करताना आधी कढईत तूप घालून खवा परतून घ्यावा. त्यातच नारळाचा चव घालून तो गरम करावा. साखरेत 4 मोठे चमचे पाणी घालून दोन तारी पाक करुन घ्यावा. त्यात खवा आणि नारळाचं मिश्रण घालावं. ते चांगलं एकजीव करावं. मग या मिश्रणाचे तीन समान भाग करुन एका भागात कोको पावडर, दुसर्या भागात स्ट्रॉबेरी इसेन्स आणि रंग घालावा आणि तिसरा भाग हा पांढरा ठेवावा. ताटाला तुपाचा हात लावून आधी कोकोचं मिश्रण थापावं, त्यावर पांढरा भाग थापावा आणि सर्वात वरती स्ट्रॉबेरीचं मिश्रण असे एकावर एक थर थापून वर चांदीचा वर्ख लावावा. थापलेलं मिश्रण गार झालं की त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
नारळाचे कपूरकंद
छायाचित्र- गुगल
नारळाचे कपूरकंद तयार करण्यासाठी 200 ग्रॅम किसलेला भोपळा, चिमूटभर तुरटी, 150 ग्रॅम साखर, 2 मोठे चमचे पाणी, 2 वाटी ओल्या नारळाचा चव , केवडा किंवा रोझ इसेन्स हे साहित्य घ्यावं.
कपूरकंद करताना आधी भोपळ्याची साल काढून भोपळा किसून घ्यावा. किसलेला भोपळा पाण्यात चिमूटभर तुरटी घालून त्यात घालावा आणि पाण्याला एक उकळी आणावी. उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन भोपळ्याचा किस काढून तो दुसर्या पाण्यात धुवून घ्यावा. नंतर साखरेत दोन चमचे पाणी, किसलेला भोपळा, ओल्या नारळाचा चव घालून शिजवावा. हे मिर्शण घट्टसर झालं की गॅस बंद करावा. त्यात केवडा किंवा रोझ इसेन्स घालावा. हे मिश्रण हाताला सोसेल इतकं कोमट झालं की त्याचे पेढ्याप्रमाणे गोळे करावेत. नारळाचे कपूरकंद करायला अगदीच सोपे आहेत.
नारळ खजूर सोंदेश
छायाचित्र- गुगल
सोंदेश करण्यासाठी बिया काढलेले 8 ते 10 खजूर, अर्धा कप दूध, 1 मोठा चमचा काजूची पूड, अर्धी वाटी पनीर, अर्धी वाटी नारळाचा चव, 1 मोठा चमचा कॉनफ्लोर , अर्धी वाटी साखर आणि वेलची पूड एवढं जिन्नस घ्यावं.
सोंदेश करताना आधी बिया काढलेले खजूर अर्धा कप दूध घालून शिजवावेत. ते शिजून घट्टसर झाले की त्यात काजूची पूड, किसलेलं पनीर, नारळाचा चव, कॉर्नफ्लोर पावडर आणि साखर घालावी. हे सर्व नीट परतून घ्यावं. यात वेलची पूड घालावी. या मिश्रणाचा घट्टसर गोळा होवू द्यावा. या गोळ्याचे छोटे छोटे भाग सोंदेशच्या साच्यात ठेवून त्याला सोंदेशचा आकार द्यावा आणि एका ताटात काढून ते फ्रीजमधे गार करायला ठेवावेत.
( लेखिका नाशिकस्थित असून त्या पाककला, हस्तकला आणि गृहसजावटीच्या वस्तू तयार करण्यात कुशल आहेत.)
rdshindore@yahoo.com