दुग्धजन्य पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. पनीर मसाला, पनीर कोफ्ता, पनीर टिक्का, शाही पनीर, इत्यादी असे अनेक पदार्थ पनीरपासून बनवले जातात. ज्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. त्यांना पनीरचे अधिक सेवन करावे असा सल्ला दिला जातो. बाजारात मिळणाऱ्या बहुतांश पनीरमध्ये भेसळयुक्त दुधाचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक लोकं घरीच पनीर तयार करतात. सध्या व्हिगनचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे अधिकतर लोकं दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करत नाही. जर त्यांना पनीर खायची इच्छा होत असेल तर, त्यांनी शेंगदाण्यापासून पनीर ट्राय करावा. कमी साहित्यात घरगुती पद्धतीने आपण शेंगदाण्यापासून पनीर तयार करू शकता.
शेंगदाण्यापासून पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
शेंगदाणे
व्हिनेगर
पाणी
कृती
एका बाऊलमध्ये २ कप शेंगदाणे घ्या. शेंगदाण्यांना पाण्यातून चांगले धुवून काढा. त्यात कोमट पाणी टाका. हे शेंगदाणे साधारण १ तास पाण्यात भिजत ठेवा. शेंगदाणे भिजल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. अर्धा छोटा कप पाणी टाकून शेंगदाण्याची घट्ट पेस्ट तयार करा.
आता एका भांड्यात १ लिटर पाण्यात शेंगदाण्याची पेस्ट टाका. मध्यम आचेवर गॅस ठेवा. पेस्ट पाण्यात मिसळेपर्यंत ढवळत राहा. 2-3 मिनिटे सतत ढवळत राहा, त्यानंतर गॅस बंद करा.
दूध तयार झाल्यानंतर गाळण्यासाठी एका बाऊलवरती कापड ठेवा आणि कापडामधून दूध काढून घ्या. एक बंडल बनवा आणि त्यातून दूध चांगले पिळून घ्या. एका भांड्यात शेंगदाण्याचे दूध गोळा करा. बंडलमध्ये शेंगदाण्याचे घट्ट मिश्रण मिळेल, जे आपण इतर भाजी किंवा बर्फी वगैरेमध्ये वापरू शकता.
आता शेंगदाण्याचे दूध एका भांड्यात काढून घ्या. ते भांड मध्यम गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर १ चमचा व्हिनेगर ४ चमचे पाण्यात मिसळा. दुधाला उकळी आली की त्यात हे व्हिनेगरचं मिश्रण टाका. गॅस बंद करून हे मिश्रण चांगले ढवळत रहा.
सर्व दूध चांगले फाटल्यानंतर रेशमच्या कपड्याच्या मदतीने गाळून घ्या. हे घट्ट मिश्रण झाकून ठेवा. अशाप्रकारे पनीर तयार झाले. एका भांड्यात पाणी घ्या त्यात हे पनीर ठेवा. जेणेकरून व्हिनेगरचा वास दूर होईल. 1 तास पनीर असेच राहू द्या. त्यांनतर हे पनीर आपण विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता.