प्रतिभा भोजने जामदार
खवा टाकून केलेले किंवा कणिक आणि रवा एकत्र करून केलेले मोदक नेहमीच करायला नको वाटतात. नैवेद्याच्या मोदकांमध्ये कधीतरी चव बदलदेखील पाहिजेच असते. म्हणूनच ही एक खास रेसिपी. उपवासाचे शेंगदाणा मोदक. हे मोदक अतिशय चवदार तर असतातच पण गुळ आणि शेंगदाणे यामुळे या मोदकांमध्ये पौष्टिक घटकही खूप असतात. शिवाय कमी वेळेत अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे नोकरदार महिलांसाठी तर ही रेसिपी विशेष उपयुक्त ठरणारी आहे.
शेंगदाणा मोदकांसाठी लागणारे साहित्य
१ वाटी भाजून सालं काढलेले शेंगदाणे, पाव वाटी गूळ, १ चमचा वेलदोडा पूड, ४ चमचे साजूक तूप.
कसे करायचे शेंगदाणा मोदक?
मिक्सरमध्ये शेंगदाणे, गूळ, वेलदोडा आणि साजूक तूप घालून फिरवून घ्यावे. मिश्रण मऊ होईल. मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट लावून त्यात हे मिश्रण भरून मोदक बनवून घ्यावेत. गूळ आणि तुपाचे प्रमाण आवडीनुसार बदलले तरी चालते.
(प्रतिभा जामदार यांच्या 'संध्याई किचन' या युट्यूब चॅनलवर विविध पाककृतीही पाहता येतील.)