दक्षिण भारतात आणि मुख्यत: केरळमध्ये जवळपास प्रत्येक घरासमोर कमीतकमी एक तरी नारळाचं झाड असतं. कुणाकुणाच्या परसदारी तर मस्त नारळाची बाग फुलवलेली असते. म्हणूनच तिथले लोक त्यांच्या आहारात नारळाचा खूप जास्त वापर करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या मुबलक प्रमाणात नारळं मिळत असल्याने तिथले लोक नारळाचं तेलही घरीच करतात. आपण बऱ्याचदा ऐकतो ना की दक्षिण भारतातले लोक स्वयंपाकासाठी नारळाचं तेल वापरतात. मैत्रिणींनो स्वयंपाकासाठी वापरत असणारं नारळाचं तेल ते दुकानातून विकत आणत नाहीत. तर स्वत: घरी तयार करतात. हेच तेल ते त्यांच्या केसांसाठीही वापरतात. त्यामुळेच तर दक्षिण भारतीय लोकांचे केस आपल्यापेक्षा खूप जास्त काळेभोर, लांबसडक आणि दाट असतात.
नारळाच्या तेलाचे फायदे
- मैत्रिणींनो दक्षिण भारतीय लोकांप्रमाणे आपणही आपल्या घरी नारळाचं शुद्ध तेल बनवू शकतो. नारळाचं तेल बनविण्याची पद्धत अतिशय सोपी असून हे तेल अतिशय आरोग्यदायी आहे.
- या तेलात कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्याने ते आरोग्यासाठी अधिक चांगले आहे.
- नारळाचं तेल आहारात वापरल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- तेलात कोणतीही भेसळ नसल्यामुळे हे तेल खाल्ल्यानंतर बॅड कॉलेस्टरॉलची वाढ रोखण्यास मदत होते.
- नारळाचं तेल केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगलं आहे.
- नारळाच्या तेलाने केसांना नियमित मसाज केल्यास केसांची वाढ तर चांगली होतेच, पण केस अकाली पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस दुभंगणे अशा समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होतात.
- नारळाचं तेल त्वचेसाठीही अतिशय पोषक आहे. या तेलाने नियमित मसाज केल्यास त्वचेचे डिहायड्रेशन होत नाही आणि त्वचा तुकतुकीत, चमकदार दिसते.
फक्त २ चुका, दिवसभरात या २ चुका करणाऱ्यांचे केस हमखास गळतात! बघा, तुम्ही चुकताय का?
कसं करायचं नारळाचं तेल?
- नारळाचं तेल करण्यासाठी सगळ्यात आधी चार ते पाच नारळं सोलून घ्या.
- नारळाचे मिक्सरमधून फिरवता येतील असे छोटे- छोटे तुकडे करा.
- थोडेसे पाणी टाकून हे तुकडे मिक्सरमधून फिरवून घ्या. असे करताना पाणी खूप जास्त घालू नये. फक्त मिक्सरमधून नारळाची पेस्ट करणे सोपे होईल, इतपतच पाणी घालावे.
- यानंतर ही पेस्ट एका गाळणीने गाळून घ्या. यामुळे नारळाचा किस आणि नारळाचे दूध हे दोन्ही वेगवेगळे होतील.
- नारळाचे दूध दोन वेळा तरी गाळून घ्यावे. जेणेकरून जर नारळाचा एखादा कण त्यात राहिला असल्यास तो निघून जाईल.
- आता नारळाचे दूध ज्या बाऊलमध्ये काढले आहे, त्यावरून एक प्लॅस्टिकची पिशवी झाका आणि हे दूध अशाच प्रकारे १२ तास रुम टेम्परेचरवर राहू द्या.
- यामुळे दुधाचे योग्य प्रकारे फर्मंटेशन होते आणि दूध आणि पाणी हे वेगळे होते.
- १२ तास झाल्यानंतर हे दूध फ्रिजरमध्ये ३० मिनिटांसाठी ठेवा.
- असे केल्याने जे दूध असेल त्याचा वर पातळसा बर्फ तयार होईल आणि पाणी पुर्णपणे वेगळे होऊन जाईल.
जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर..
- यानंतर दूधाचा तयार झालेला बर्फ अलगद वर उचलून घ्या आणि तो कढईत गरम करायला ठेवा.
- हळूहळू बर्फ वितळेल. २० ते २५ मिनिटे हे मिश्रण अशाच प्रकारे तापू द्या.
- तूप कढवताना ज्या पद्धतीने तूप झालं की भांड्यात बेरी तयार होते, तशीच बेरी या कढईतही तयार होईल.
- बेरी तयार होऊन तेल वेगळे दिसू लागले की गॅस बंद करा आणि कढईत जमलेले तेल गाळून घ्या.
- रूम टेम्परेचरवर आल्यानंतर हे तेल काचेच्या बरणीत भरून ठेवा.
- ५ नारळांपासून साधारण अर्धा लिटर तेल तयार होते.
- हे तेल तुम्ही खाण्यासाठीही वापरू शकता किंवा डोक्याला, अंगालाही लावू शकता.