रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या चायनीज ठेल्यांपासून ते मोठमोठ्या रेस्टोरंटमध्ये सर्वाधिक प्रमाणात खाल्ले जाणारे चायनीज न्युडल्स सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणतात. चटपटीत, मसालेदार, आंबट, तिखट न्युडल्स सर्वांनाच आवडतात. न्यूडल्समध्ये हक्का न्युडल्, शेजवान न्युडल्, व्हेजिटेबल न्यूडल, ट्रिपल शेजवान न्युडल्, मंच्युरियन न्यूडल असे अनेक प्रकार आहेत. न्युडल्स हे बनवायला सोपे, उपलब्ध साहित्यात होणारे, झटपट बनून तयार होणारे असल्याकारणाने हे आपण स्नॅक्स म्हणून किंवा काहीजण जेवण म्हणून सुद्धा खातात. आजकाल या न्यूडल्सनी लग्नाचा मेन्यू, बड्डे पार्टी, गेट टू गेदर, ऑफिस पार्टी, किटी पार्टीज यांमध्ये चायनीज डिश म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. तुमच्या घरीसुद्धा या नवीन वर्षात असे काही फंक्शन असेल आणि पार्टीसाठी चायनीज डिशची फर्माईश आली असेल तर न्युडल्स ऑर्डर करण्यापेक्षा चटकन घरीच बनवा. झटपट न्युडल्स घरी बनवण्यासाठी साहित्य आणि कृती समजून घेऊयात(Make Restaurant Style Noodles At Home).
साहित्य -
१. नूडल्स - १ बाऊल२. कोबी - २ कप (लांब चिरलेला)३. कांदा - २ कप (लांब चिरलेला)४. हिरवी मिरची - ३ ते ४ (बारीक चिरलेली)५. शिमला मिरची - १ कप (बारीक चिरलेली)६. लसूण - ५ ते ६ पाकळ्या ७. काळीमिरी पूड - १/४ टेबलस्पून८. मीठ - चवीनुसार९. टोमॅटो सॉस - २ टेबलस्पून१०. सोया सॉस - १ टेबलस्पून११. चिली सॉस - १ टेबलस्पून१२. तेल - २ ते ३ टेबलस्पून१३. व्हिनेगर - १ टेबलस्पून
कृती -
न्यूडल शिजवून घेण्याची कृती -
१. २ कप पाण्यात थोडेसे तेल व चवीनुसार मीठ घालून हे न्युडल्स शिजवून घ्या. २. न्युडल्स शिजताना त्यात तेल घालायला विसरू नका नाहीतर ते एकमेकांना चिकटून जातील. तेलामुळे हे न्युडल्स एकमेकांपासून वेगळे राहून चिकटणार नाहीत.
३. न्युडल्स पूर्ण न शिजवता अर्धवट शिजवून घ्यावेत. ४. शिजवून झाल्यावर हे न्युडल्स एका चाळणीत काढून घ्यावेत. त्यातील सगळे पाणी संपूर्णपणे निथळून जाऊ द्यात.
न्युडल्स बनविण्याची कृती -
१. एका कढईत तेल घेऊन ते गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात लांब चिरलेला कांदा, हिरवी मिरची व बारीक चिरलेली लसूण परतून घ्या. २. यानंतर कोबी, शिमला मिरची घालून हलकेच परतून घ्या. न्युडल्स बनवताना त्यातील भाज्या जास्त शिजवू नये त्यामुळे न्युडल्सची चव बिघडू शकते. या भाज्या अर्ध्याच शिजवाव्यात त्यांच्यातील क्रचीनेस तसाच टिकवून ठेवा.
३. भाज्या शिजवून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरी पूड घालावी. ४. या भाज्यांच्या मिश्रणात उकळवून थंड केलेले न्युडल्स घालावे. थोडेसे व्हिनेगर घालावे.
५. २ ते ३ मिनिटे शिजवून घेतल्यानंतर त्यात टोमॅटो सॉस,सोया सॉस, चिली सॉस घालावेत. ६. सगळे सॉस घालून झाल्यावर हे न्युडल्स चमच्याच्या मदतीने एकत्रित करून घ्यावे.
हे गरमागरम न्युडल्स सूप किंवा शेजवान चटणी सोबत सर्व्ह करावेत.