घरच्या जेवणाचा कधी कंटाळा आला तर आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करून त्यावर मस्त ताव मारतो. सहसा जेवणाच्यावेळी हॉटेलमध्ये गेल्यावर आपण रोटी, फुलका, नान, रुमाली रोटी असे पोळीचे अनेक प्रकार ऑर्डर करतो. त्यासोबतच आपण आपल्या आवडीची भाजी घेऊन या पोळीसोबत खातो. आपण घरी रोजच्या जेवणाला पोळीच बनवतो. पण कधीतरी थोडस वेगळं खाण्याचा बेत आखला की आपण घरच्या घरी रोटी, नान, फुलका, पराठा बनवतो. रुमाली रोटी हा देखील पोळीचा एक छान प्रकार आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जेवणात रुमाली रोटी खायला भरपूर आवडत असेल. काही सोप्या टीप्स वापरून आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल रुमाली रोटी झटपट तयार करू शकतो. हॉटेल स्टाईल रुमाली रोटी बनविण्यासाठी त्याला लागणारे साहित्य आणि कृती समजून घेऊयात(How To Make Rumali Roti At Home).
साहित्य :-
१. मैदा - ३ कप २. गव्हाचे पीठ (कणिक) - २ कप ३. तेल - २ टेबलस्पून '४. मीठ - १/४ टेबलस्पून ५. साखर - १/२ टेबलस्पून ६. दूध किंवा गरम पाणी - ३/४ कप
snehasinghi1 या इंस्टाग्राम पेजवरून रुमाली रोटी घरी कशी बनवता येईल याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
कृती :-
१. सगळ्यात आधी मैदा आणि कणिक चाळून घ्या.
२. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर, मीठ घालून घ्या.
३. थोडं थोडं दूध आणि थोडंसं पाणी असं हळूहळू टाकून पीठ चांगलं मळून घ्या.
४. हे पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल, तेवढी रोटी मऊ होईल. त्यामुळे ५ ते १० मिनिटे नीट मळून घ्या.
५. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाला तेल लावून एका भांड्यात ठेवा. या भांड्यावर एक ओलसर कपडा टाकून ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
६. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून त्याची अगदी पातळ अशी रोटी लाटावी.
७. ही रुमाली रोटी भाजण्यासाठी गॅसवर एक लोखंडाची कढई उपडी ठेवून मग त्यावर रुमाली रोटी घालून ती व्यवस्थित भाजून घ्यावी.
हे पण लक्षात ठेवा...
१. रुमाली रोटी भाजण्यासाठी तुम्हाला कढईचा वापर करायचा आहे. हॅण्डालियमची कढई वापरण्याऐवजी लोखंडी कढई वापरणं कधीही अधिक चांगलं.
२. ही कढई गॅसवर उपडी टाका. कढई तापली की तिच्यावर आधी मिठाचं पाणी शिंपडा. जेणेकरून रोटी कढईला चिटकणार नाही. त्यानंतर त्यावर थोडे तुप किंवा तेल टाका. आणि एका कापडाने ते कढईला व्यवस्थित लावून घ्या.