रोजच काय भाजी पोळी, काहीतरी वेगळं हवं असा मुलांचा हट्ट असतो. मुलांना वेगळं म्हणजे पिझा, बर्गरच्या कॅटेगरीतलं काहीतरी भन्नाट खायचं असतं. आता यासाठी एकतर बाहेरुन ऑर्डर करावं लागतं नाहीतर मुलांना बाहेर घेऊन जावं लागतं. हे दोन्ही पर्याय मुलांच्या आरोग्याचा विचार करता हानिकारकच. मग मुलांचा वेगळं खाण्याचा हट्ट कसा बरं पूर्ण होणार? यासाठी ब्रेड पिझा हा सोपा पर्याय आहे. घरच्याघरी स्पेशल चवीचा ब्रेड पिझा करा. हा ब्रेड पिझा हाॅटेलपेक्षाही भारी लागतो हे नक्की. घरी पिझा करणं म्हणजे अवघड काम असा गैरसमज हा ब्रेड पिझा केल्यानंतर हमखास दूर होईल.
Image: Google
ब्रेड पिझा कसा करणार?
ब्रेड पिझा करण्यासाठी 6 ब्रेड स्लाइस, अर्धा कप स्वीट काॅर्न, 1 बारीक चिरलेला टमाटा, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 कप बारीक किसलेलं मोझरेला चीज, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स, 2 मोठे चमचे बटर, अर्धा कप टमाटा साॅस, 2 छोटे चमचे चिली साॅस, 1 छोटा चमचा मिश्र हर्ब्स आणि चवीनुसार मीठ घ्यावं. ब्रेड पिझा करण्यासाठी आधी पिझा साॅस तयार करावं. यासाठी एका भांड्यात टमाटा साॅस, चिली साॅस, चिली फ्लेक्स आणि मिश्र हर्ब्स मिश्रण एकत्र करावं.
Image: Google
नंतर ब्रेड स्लाइस घ्यावी. त्यावर तयार केलेलं पिझा साॅस लावावं. रेडीनेड पिझा साॅसपेक्षाही हे साॅस छान लागतं. साॅस लावलेल्या ब्रेडवर बारीक चिरलेला टमाटा, सिमला मिरची आणि उकडलेले काॅर्नचं टाॅपिंग करावं. वरुन किसलेलं मोजरेला चीज घालावं. शेवटी यावर चिली फ्लेक्स आणि मिश्र हर्ब्स भुरभुरुन घालावं. नाॅनस्टिक तवा गरम करावा. तवा गरम झाला की त्यावर बटर लावावं. टाॅपिंग केलेले ब्रेड तव्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवावं. वर घातलेलं चीज वितळेपर्यंत मंद गॅसवर ब्रेड भाजावेत. असा ब्रेड पिझ्झा मुलांना न आवडला तरच नवल!