दोन मिनिटात होणारी मॅगी अनेकांच्या आवडीच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर येते. मॅगी तशीच खाल्ली किंवा विविध प्रयोग करुन खाल्ली तरी छान लागते. नवीन प्रयोग करायचा तर हाताशी मॅगी हवी असंही म्हटलं जातं. मॅगी पकोडा, तडका मॅगी, पनीर मॅगी, मॅगीची पाणीपुरी असे विविध प्रकार या प्रयोगातूनच जन्माला आले आणि लोकप्रिय झाले. हे प्रकार बाहेर विकत मिळत नाही. घरी मॅगी किंवा आटा नूडल्स आणून ते घरी केले जातात. या प्रयोगातलाच एक प्रकार म्हणजे मॅगी भेळ. संध्याकाळी भूक लागली, चहासोबत काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर मॅगी भेळ हा मस्त प्रकार आहे. आपल्याला किती इनोव्हेटिव्ह आणि वेगळं सुचतं हे दाखवण्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे मॅगी भेळ करणं. मॅगी भेळ म्हणजे स्वत:ला आणि आपल्याबरोबर इतरांनाही खूश करण्याचा चटपटीत पर्याय आहे. चहा उकळेपर्यंत मॅगी भेळ करुन होते, इतक्या झटपट होणारा प्रकार आहे हा.
Image: Google
कशी करायची मॅगी भेळ
मॅगी भेळ करण्यासाठी 1 मॅगीचं पाकिट ( मॅगी ऐवजीआटा नूडल्स घेतल्या तरी चालतात), बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोड्या तेलावर भाजलेले शेंगदाणे, लिंबाचा रस/ टोमॅटो केचप/ चिंच खजुराची आंबट गोड चटणी, 1 चमचा मॅगी मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, हवं असल्यास थोडं मीठ आणि बारीक शेव एवढंच साहित्य लागतं.
Image: Google
मॅगी भेळ करताना आधी मॅगी हातानं बारीक चुरुन घ्यावी. कढई गरम करुन मॅगी कोरडीच किंवा थोड्याशा तेलावर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावी. थोड्याशा तेलावर शेंगदाणे लालसर भाजून घ्यावेत. मॅगी भाजताना आणि शेंगदाणे तेलात परततान गॅसची आच मंद ठेवावी. एका भांड्यात भेळीच्या प्रमाणानुसार लिंबाचा रस/ टमाट्याचं केचप/ खजुराची चटणी घ्यावी. त्यात मॅगी मसाला, चाट मसाला, हवं असल्यास मीठ घालून ही पेस्ट फेटून घ्यावी. यात चिरलेला कांदा, टमाटा घालावा. तो मसाल्यात चांगला मिसळून घ्यावा. मग यात परतलेले शेंगदाणे घालून ते मिसळले की मग भाजलेला मॅगीचा चुर घालून तो नीट मिसळून घ्यावा. मॅगीचा चुरा नीट मिसळला गेला की त्यात बारीक शेव घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मॅगी भेळ चांगली एकत्र करुन फस्त करुन टाकावी.
मॅगी भेळ केल्यानंतर लगेच संपवावी. नाहीतर ओली चटणी आणि कांदा टमाटा यामुळे ती ओलसर होवून त्याची मजा जाते. जेव्हा खायची तेव्हाच मॅगी भेळ केल्यास छान कुरकुरीत आणि चटपटीत लागते. मॅगी भेळमध्ये डाळिंबाचे दाणे, उकडलेला बटाटा बारीक फोडून करुन घातला तर भेळ आणखी छान लागते. कसा वाटला हा चटपटीत भेळीचा झटपट पर्याय?