चायनिज पदार्थांप्रमाणेच इटालियन पदार्थही आपल्याकडे अतिशय चवीने खाल्ले जातात. पास्ता असो की पिझ्झा.. हे पदार्थ पाहिले की अगदी लहान मुलांसह मोठ्या माणसांच्या तोंडालाही पाणी सुटते. असे पदार्थ हॉटेलमध्ये खाल्ले तर निश्चितच त्याच्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागते. शिवाय एवढे पैसे देऊनही हे पदार्थ खाऊन पोट भरेलच असे काही नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये एवढे पैसे देऊन पास्ता खाण्यापेक्षा घरच्याघरीच तयार करा. चीज पास्ता आणि रेड सॉस पास्ताच्या या घ्या दोन झकास रेसिपी. या रेसिपीनुसार तुम्ही पास्ता बनविला तर अगदी घरी बनविलेल्या पास्ताला रेस्टॉरंटसारखी चव येईल आणि बच्चे कंपनीसह घरातली मोठी मंडळीही मिटक्या मारत पास्ता संपवतील. आपल्याकडे चीज पास्ता आणि रेड सॉस पास्ता मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्यामुळे या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा.
चीज सॉस पास्तासाठी लागणारे साहित्य १०० ग्रॅम चीज आणि तेवढाच पास्ता. दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, १ मोठ्या आकाराचा टोमॅटो, ४ टेबलस्पून बटर, आवडीनूसार चिलीफ्लेक्स, १ टीस्पून ओरिगॅनो आणि आवडीनुसार मीठ.
कसा बनवायचा चीज सॉस पास्ता?- चीज सॉस पास्ता बनविण्यासाठी सगळ्यात आधी पॅन गॅसवर तापायला ठेवा. त्यामध्ये बटर घाला. बटर तापल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि तो हलकासा परतून घ्या.
- यानंतर त्यात टोमॅटो टाका आणि परतून घ्या. टोमॅटो परतून सॉफ्ट झाला की त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला आणि थोडेसे लाल तिखट टाका. यामध्ये आता चीज टाका. चीज टाकल्यानंतर ऑरिगॅनो टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. - आता या मिश्रणात उकडलेला पास्ता टाका. सगळे मिश्रण हलवून घ्या. गरज पडल्यास पुन्हा मीठ घाला. एखादा मिनिट या मिश्रणावर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. यानंतर गरमागरम पास्ता सर्व्ह करा. - आवडीनूसार यावर पुन्हा थोडे किसलेले चीज टाका. गरजेनुसार चिली फ्लेक्स टाका आणि गरमागरम चीज पास्ताचा आनंद घ्या.
रेड सॉस पास्ता करण्यासाठी लागणारे साहित्य १ वाटी पेनी पास्ता, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, ३ ते ४ लाल मिरच्या, एक मध्यम आकाराचा कांदा, १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, एक टी स्पून काळी मिरी पावडर, २ टी स्पून मिक्स हर्ब्स किंवा ओरिगॅनो, २ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ अणि चिलीफ्लेक्स.रेड सॉस पास्ता बनविण्याची रेसिपी- सगळ्यात आधी एका पॅनमध्ये एक वाटी पाणी टाका. पाणी गरम झाले की त्यामध्ये टोमॅटो, लाल मिरची टाका आणि एक उकळी येऊ द्या. यानंतर गॅस बंद करा आणि टोमॅटो व मिरची थंड होऊ द्या.
- थंड झाल्यानंतर टोमॅटोची साले काढून टाका आणि उकडलेली मिरची व टोमॅटो मिक्सरमधून फिरवून घ्या. हा झाला आपला रेड सॉस.- एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा आणि लसूण टाकून हलकेसे परतून घ्या.- आता यामध्ये आपण तयार केलेला रेड सॉस टाकावा. चांगली उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, मिरेपूड, ओरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स टाका. झाकण ठेवून अर्धा मिनिटे वाफ येऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये उकडलेला पास्ता टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. गरमागरम पास्ता सर्व्ह करा आणि त्यावर मस्त चीज किसून टाका. असा होम मेड यम्मी आणि हेल्दी पास्ता खाऊन सगळेच खूश होतील.