फणसाच्या आठळ्या अनेकजण उकडून खातात. तर अनेकजण तशाच टाकून देतात. फणसाच्या आठळ्या या औषधी असतात. त्यांची भाजी करुन खाणं हा जसा एक पर्याय आहे तसाच फणसाच्या आठळ्यांचं लोणचंही छान होतं. हे लोणचं पोळी आणि खिचडीसोबत छान लागतं.
फणसाच्या आठळ्यांचं लोणचं करण्यसाठी तीन किलो फणसाच्या आठळ्या ( तुकडे केलेले) सव्वा कप मीठ, एक कप हळद, अडीचकप वाटलेली मोहरीची डाळ, एक कप लाल तिखट, दोन मोठे चमचे कलौंजी, दोन मोठे चमचे हिंग आणि दोन किलो मोहरीचं तेल.
छायाचित्र- गुगल
आठळ्यांचं लोणचं करताना
आधी आठळ्या स्वच्छ धुवून आठळ्यांना पाव कप मीठ चोळून त्या उकडून घ्याव्यात. उकडल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकावं आणि आठळ्या सुकायला ठेवाव्यात. त्या चांगल्या सुकल्या की त्या एका काचेच्या हवाबंद बरणीत घालाव्यात. त्यात मोहरीची डाळ, लाल तिखट, कलौंजी आणि हिंग घालावं. आठळ्यांना हा मसाला छान लावावा. बरणीला झाकण लावून ठेवावं.
पुढचे चार दिवस आठळ्या मसाल्यामधे मुरु द्याव्यात. रोज एकदा बरणी उघडून आठळ्या हलवाव्यात. पण नंतर बरणीला झाकण नीट लावावं. चार दिवसानंतर मोहरीचं तेल गरम करावं. ते थंड झालं की मसाल्यात मुरलेल्या आठळ्यांमधे तेल घालावं. लोणचं तेलात बुडायला हवं. लोणचं मुरायला आणखी तीन चार दिवस लागतात. आठळ्याच्या लोणच्यासाठी तेल जास्त लागतं . ते कमी झालं तर लोणचं कोरडं होतं.