नाश्ता हा दिवसभराच्या आहारातला महत्वाचा भाग. पण सकाळच्या घाईत नेमका तोच करायला वेळ नसतो. केवळ वेळ मिळत नाही म्हणून नाश्ता न करणारेही असतात. पण सकाळचा नाश्ता वेळेअभावी चुकवणे ही आरोग्यासाठी चांगली बाब नाही. नियमित नाश्ता करणाऱ्यांनाही अनेकदा वेळेअभावी नाश्ता चुकवावा लागतो. पण नाश्ता न चुकवता, घाईची वेळ साधूनही अनेक झटपट पदार्थ तयार करता येतात. हे पदार्थ पौष्टिक तर असतातच आणि चविष्टही लागतात. या झटपट पदार्थांच्या (instant menu for breakfast) यादीतला एक पदार्थ म्हणजे हैद्राबाद येथील प्रसिध्द स्पाॅट इडली (spot idli) . घाईच्या वेळेत अवघ्या दोन मिनिटात होणारी स्पाॅट इडली केल्यास नाश्ता चुकवण्याची वेळ येणार नाही आणि मस्त चविष्ट खाल्ल्याचं समाधानही मिळेल. ही स्पाॅट इडली क्विक मील (quick meal) प्रकारातली आहे. ती कशी करावी (how to make spot idli) हे प्रसिध्द फूड ब्लाॅगर पारुल यांनी आपल्या 'कूक विथ पारुल' या यूट्यूब चॅनेलवर शेअर केली आहे.
Image: Google
स्पाॅट इडली कशी करावी?
स्पाॅट इडली करण्यासाठी तेल, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टमाटा, आलं लसणाची पेस्ट, मीठ, सांबार मसाला, कोथिंबीर, रवा आणि दही या सामग्रीची गरज आहे.
स्पाॅट इडली करण्यासाठी नाॅन स्टिक तवा घ्यावा. त्यावर तेल घालावं. तेल गरम झालं की त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट टाकून ते चांगलं परतून घ्यावं. नंतर टमाटा आणि मीठ टाकावं. हे सर्व परतून मंद आचेवर शिजू द्यावं. मिश्रणातला टमाटा चांगला शिजला की मग बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सांबार मसाला घालावा. स्पाॅट इडली करताना कांदा टमाट्याच्या मिश्रणात नेहमी सांबार मसालाच घालावा असं नाही तर चव बदल म्हणून कधी पाव भाजी मसाला कधी नूडल्स मसाला घातला तरी चालतो.
Image: Google
एका बाजूला मसाला करतानाच दुसऱ्या बाजूला रवा दह्याचं मिश्रण तयार करावं. त्यासाठी एका भांड्यात एक कप रवा, पाऊण कप दही घ्यावं. ते एकत्र करुन घ्यावं. मिश्रण इडलीच्या पिठाएवढं पातळ करावं. त्यासाठी मिश्रणात बेतानंच पाणी घालावं. मिश्रण फार पातळ करु नये. या मिश्रणात चवीपुरतं मीठ आणि चमच्याभर तेल घालावं. ते मिश्रणात मिसळून घेतलं की त्यात एक चमचा फ्रूट साॅल्ट घालून मिश्रण फेटून घ्यावं. तव्यावरील मसाल्याचे चार भाग करावेत. गॅसची आच मंद ठेवावी. मग या मसाल्यांच्या चार भागावर चमच्यानं रव्याचं मिश्रण घालावं. वरुन थोडा सांभार मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. खोलगट झाकणीनं तवा झाकावा. साधारण मिनिटभरानंतर झाकण काढावं. इडल्या उलटवून् दुसऱ्या बाजूनंही शेकून घ्याव्यात. या स्पाॅट इडल्या गरम गरम पुदिना कोथिंबीरच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतात.