त्याच त्या भाज्या आणि पोळी किंवा भाकरी खाऊन आपल्याला बरेचदा कंटाळा येतो. इतकंच काय पण उन्हाळ्याच्या दिवसांत तर सतत पाणी पाणी झाल्याने तोंडाला अजिबात चव राहत नाही. अशावेळी ताटात झणझणीत, चिवष्ट काही असेल तर २ घास जास्त जेवण जाते. भाकरी, पोळी किंवा अगदी वरण-भातासोबत तोंडी लावायला आपण आवर्जून चटणी किंवा लोणचं घेतो. हे तोंडी लावण्याचे पदार्थ जेवणाची रंगत वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. जेवणात भाजी कंटाळवाणी असेल आणि तोंडाची चव गेली असेल तर लाल मिरची आणि लसूण हे दोनच पदार्थ वापरुन अतिशय चविष्ट असा ठेचा करता येतो. हा ठेचा झटपट होणारा असल्याने फार वेळही जात नाही. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर अगदी ५ मिनीटांत होणाऱ्या या झणझणीत ठेच्याची रेसिपी शेअर करतात. तो कसा करायचा पाहूया (Authentic Easy Chili Garlic Chutney Recipe)...
१. गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि त्यात अर्धी वाटी मोहरीचे तेल घ्यायचे. मोहरीचे तेल नसले तर दुसरे कोणतेही तेल घेतले तरी चालेल.
२. तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये २५ ते ३० लाल सुक्या मिरच्या घालायच्या.
३. या मिरच्या चांगल्या गरम झाल्या की कडक होतात आणि थोड्या फुगतात.
४. मग एका गाळणीने या मिरच्या गाळायच्या म्हणजे तेल खालच्या भांड्यात येते.
५. तेच तेल पुन्हा पॅनमध्ये घालून त्यात अर्धा चमचा हिंग, १ चमचा जीरे आणि २ चमचे धणे घालायचे.
६. यामध्ये लसणाच्या १५ ते २० मोठ्या आकाराच्या पाकळ्या घालून हे सगळे तेलात चांगले परतून घ्यायचे.
७. आता बाजूला काढलेल्या मिरच्या, गरम केलेले लसूण मिक्सरच्या भांड्यात घालायचे.
८. यामध्ये आमचूर पावडर घालावी. नसेल तर व्हिनेगर किंवा लिंबाचाही वापर करु शकतो. चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण मिक्सरमधून बारीक होईपर्यंत फिरवायचे.
९. ही चटणी ३ ते ४ महिेने चांगली टिकत असल्याने जेवणासोबत किंवा प्रवासातही आपण ही चटणी वापरु शकतो.