पंजाबी कडा प्रसाद हा प्रकार कधी खाल्ला आहे का? सणासुदीला पंजाबी लोकांच्या घरोघरी हा पदार्थ हमखास केला जातो. (Make this soft halwa with just 4 ingredients)करायला अगदीच सोपा असलेला हा पदार्थ चवीला फारच मस्त लागतो. मऊ असा हा हलवा जिभेवर विरघळतो. गव्हाच्या पीठाचा शिरा असे या पदार्थाला म्हणता येईल. एकदा नक्की करुन बघा. (Make this soft halwa with just 4 ingredients)
साहित्य
तूप, गव्हाचे पीठ(कणीक), साखर, पाणी
कृती
१. एका कढईमध्ये एक वाटी भरुन तूप घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ घाला. दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले तरी भरपूर हलवा करता येतो. गव्हाचे पीठ तुपावर व्यवस्थित खमंग परतून घ्या. मंद आचेवर परता नाही तर पीठ करपते. त्याला करपूस वास येतो. किमान ७ ते ८ मिनिटे तरी तुपावर कणीक परतून घ्या.
२. तुपाचा वापर या रेसिपीमध्ये भरपूर करावा लागतो. पीठ ओले व घट्ट होईल एवढे तूप वापरायचे. पीठ तुपामध्ये एकजीव झाले की त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रण न थांबता ढवळायचे. कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. पिठाचा रंग हळूहळू बदलायला लागेल. गडद तपकिरी असा रंग झाला की त्यामध्ये साखर घाला. दोन वाटी पिठासाठी एक वाटी साखर वापरा. साखर छान मिक्स होईपर्यंत ढवळा. साखर विरघळल्यावर त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. पाणी घातल्यावर पीठाचे गोळे होतील. ते मोडून घ्यायचे. मिश्रण छान एकजीव करुन घ्यायचे. पाच ते सात मिनिटांनी मिश्रण एकदम घट्ट होईल मग पुन्हा थोडेसे पाणी घाला. असे दोन वाटी पाणी वापरावे लागते.
३. पाण्याऐवजी दुधाचा वापर काही जण करतात. मात्र दुधाचा हलवा मोकळा होत नाही. अति चिकट होतो. हलवा मस्त ढवळा तो गडद तांबूस रंगाचा होईल. त्याला तूप सुटेल. तूप सुटले म्हणजे हलवा तयार आहे.
तुम्हाला जर सुकामेवा आवडत असेल तर वरतून सुकामेवा घाला. कढईमध्ये तूप घ्या त्यावर तो परता आणि मगच हलव्यामध्ये घाला. प्रसादासाठी तसेच पाहुण्यांसाठी असा हलवा नक्की करुन बघा.