मिठाई घरी करायची म्हणजे फार कष्ट असतात. त्यापेक्षा मग हलवायाकडून आणणे आपल्याला सोपे वाटते. (make white milk pedhe at home instantly! Very easy to make)मात्र ही रेसिपी पाहील्यावर तुम्हाला विकतचे पेढे आणावेसे वाटणारच नाहीत. घरीच इतके सुंदर व चविष्ट पेढे अगदी झटपट तयार करता येतात. (make white milk pedhe at home instantly! Very easy to make)दुधाच्या विविध मिठाई आपण खातोच. पण कधी हा दुधाचा पेढा खाल्ला आहे का? पाहा कसा करायचा.
साहित्य
दूध, मिल्क पावडर, तूप, साखर, बदाम, वेलची पूड
प्रमाण
चार ते पाच चमचे तूप
एक मोठी वाटी दूध
चार ते पाच चमचे साखर
दिड वाटी मिल्क पावडर
या प्रमाणामध्ये जवळपास २० ते २५ मध्यम आकाराचे पेढे करता येतात. त्यानुसार तुम्हाला किती पेढे करायचे आहेत, त्याचा अंदाज लावणे सोपे जाईल.
कृती
१. एका कढईमध्ये चार चमचे तूप घ्या. ते जरा कोमट झाले की त्यामध्ये एक वाटी दूध घाला. चार ते पाच चमचे साखर घाला. मंद आचेवर मिश्रण ढवळत राहा. साखर व्यवस्थित विरघळू द्या. तसेच तूप व दूध एकजीव होऊ द्या. तूप जरा वेगळेच राहते. पूर्ण एकजीव होत नाही. तुपाचा तवंग दिसतो.
२. मिश्रण जरा उकळले की त्यामध्ये दिड वाटी मिल्क पावडर घाला. मिल्क पावडरमध्ये गुठळी नाही ना हे नीट पाहून घ्या. वाटल्यास एकदा चाळून घ्या. नाही तर पेढा छान मऊ होणार नाही.
३. मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ढवळत राहा. त्यामध्ये चवीसाठी व वासासाठी वेलची पूड घाला. तुम्हाला जर वेलची पूड घालायची नसेल तरी हरकत नाही. हळूहळू मिश्रण घट्ट होईल. पीठासारखे दिसायला लागेल. मिश्रण कढईला चिकटायचे बंद झाले की गॅस बंद करा. एका ताटलीमध्ये ते मिश्रण काढून घ्या. जरा कोमट होई द्या. अगदी गार होईपर्यंत थांबू नका.
४. हाताला तूप लावा. मस्त पेढे वळून घ्या. छान मऊ व नरम होतात. पेढ्याच्या मधोमध एक बदाम लावा. पेढा दिसायलाही छान दिसतो. चवीलाही छान लागतो. बदामाऐवजी काजू वापरू शकता. तसेच पिस्ता वापरू शकते. तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरा.