Join us  

झणझणीत कोल्हापुरी मसाला आता बनवा घरच्याघरी! अस्सल चव- कोल्हापूरच्या रांगड्या मातीचा नादखुळा स्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 2:31 PM

Make Zanjanit Kolhapuri Masala now at home! Authentic Taste कोल्हापूरी मसाला घरच्याघरी बनवण्याची एकदम अस्सल कृती

कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रासाठी दक्षिण काशी, या शहराची खासियत सातासमुद्रापार गाजते. एक घाव अन् शंभर तुकडे करणारी माणसं हृदयातून फार कोमल असतात. रांगडेबाज रुबाब यासह खाण्याची शैली ही महाराष्ट्रातल्या लोकांना माहीतच असेल. कोल्हापुरात खाण्याची शैली फार वेगळी आहे. त्या ठिकाणी लोकांना झणझणीत, मिरचीचा ठसका लागल्याशिवाय आपण जेवलो आहे असे वाटतच नाही.

कोल्हापुरात आल्यानंतर गुळमाट चहा संग झणझणीत तर्री मिसळ खाल्ली नाहीतर तुमचं कोल्हापूर ट्रीप अर्धवट राहिलं म्हणून समजा. कोल्हापुरी भडंग, वेज कोल्हापुरी, कोल्हापुरी झणझणीत मिसळ, कोल्हापूरचा झुणका यासह अनेक पदार्थ जगभरात फेमस आहे. मात्र, या पदार्थाची खरी रंगत कोल्हापूरच्या झणझणीत तिखट मसाल्यामुळे रंगते. या मसाल्याशिवाय पदार्थाला चव नाही. अनेक लोकं बाजारातून कोल्हापुरी तिखट मसाला आणतात. परंतु, बाजारातून हा मसाला आणण्यापेक्षा आपण हा तिखट मसाला घरी देखील बनवू शकता. हा मसाला आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरू शकता. हा झणझणीत तिखट मसाला आपल्याला कोल्हापूरची आठवण करून देईल यात काही शंका नाही. काय मग बनवून पाहताय न्हवं हा कोल्हापुरी तिखट मसाला.

कोल्हापुरी तिखट मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ कप सुक्या लाल मिरच्या

१/२ कप सुक्या खोबर्‍याचा किस

२ टेस्पून तीळ

१ टेस्पून धणे

१ टेस्पून जिरे

१ टेस्पून काळी मिरी

१ टिस्पून मोहरी

१ टिस्पून मेथीदाणे

२ तमालपत्र

१ टिस्पून लवंग

१ टिस्पून तेल

१/४ टिस्पून जायफळपूड

२ टेस्पून काश्मिरी लाल तिखट

कोथिंबीर

आलं

लसूण

तिखट मसाला बनवण्याची कृती

१. सर्वप्रथम, एका परातीत सगळे मसाले काढून घ्या. लाल तिखट आणि जायफळ पूड वगळून सगळे मसाले एकत्र करा. लाल तिखट आणि जायफळ पूड आपण शेवटी मसाला वाटल्यानंतर मिक्स करणार आहोत.

२. आता गॅसवर कढई तापवत ठेवा. त्या कढईत परातीत ठेवलेले सगळे मसाले टाका. त्या मसाल्यांवर १ टिस्पून तेल टाका. मिडीयम आचेवर हे सर्व मसाले भाजून घ्या. भाजताना मसाले चमच्याने सतत ढवळत राहा.

३. मसाले भाजताना मिरचीच्या कडा थोड्या काळ्या होतील, मोहरी तडतडेल, धणे-जिरे-तिळ ब्राऊन होऊ पर्यंत भाजून घ्या. असे झाल्यावर मसाले भाजले गेलेत असे समजा. तसेच मसाले भाजले गेल्याचा छानसा सुवासही घरात दरवळेल. मसाले खुप काळपट भाजू नयेत किंवा करपवू नयेत. याने मसाल्यांची चव जाऊ शकते.

४. भाजलेले मसाले लगेच दुसर्‍या परातीत पसरवून ठेवावेत. थंड हवेच्या ठिकाणी ही परात ठेवावी. यामुळे मसाले गार होतील. मसाले गार झाल्यानंतर हे सगळे मसाले थोडे - थोडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या. मसाले बारीक करत असताना त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, लसूण टाकून बारीक करा.

५. मसाला बारीक झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये मिश्रण काढून घ्या. तयार मसाल्यात जायफळ पूड आणि रंगासाठी २ टीस्पून काश्मिरी लाल तिखट मिसळा. संपूर्ण मसाला चांगले मिक्स करा. ज्यामुळे चवीला हा मसाला उत्कृष्ट लागेल. तयार मसाला घट्ट झाकणाच्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून कोरड्या जागी ठेवावा. आपण आपल्या आवडीनुसार पदार्थात हा मसाला मिक्स करू शकता.

टॅग्स :अन्नकोल्हापूरकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स