Join us  

स्नॅक टाइममध्ये खायला करा चटपटीत-हेल्दी मखाना चाट, १० मिनीटांत होणारी परफेक्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2023 5:56 PM

Makhana Chat Healthy Tasty Recipe : मधल्या वेळेत खाण्यासाठी मखान्याची खास रेसिपी...

मखाना हा ड्रायफ्रूटमधील एक प्रकार असून तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. म्हणूनच लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना ताकद येण्यासाठी आवर्जून मखाना दिला जातो. कमळाच्या बिया (lotus seed)असलेल्या मखान्याला इंग्रजीमध्ये फॉक्स नट (fox nut) म्हणतात. मखान्यामध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स असे शरीराचे पोषण करणारे घटक भरपूर प्रमाणात असतात (Makhana Chat Healthy Tasty Recipe). 

हृदयरोग, किडनीविकार दूर ठेवण्यासाठी तर मखाना खावाच पण मधुमेह असणाऱ्यांनी, वजन कमी करायचे असलेल्यांनी आवर्जून आहारात मखान्याचा समावेश करायला हवा. मखाने आपण परतून वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये खातो. तर कधी त्याचे लाडू करतो. मखान्याचा सलाडमध्येही वापर केला जातो. मधल्या वेळेला खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून मखाना उत्तम पर्याय आहे. अशाचप्रकारे मखान्याचा एक आगळावेगळा पदार्थ आपण आज पाहणार आहोत, तो म्हणजे 'मखाना चाट'. 

(Image : Google)

अगदी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी चटपटीत आणि हेल्दी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा. यासाठी फक्त चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरचीचे तुकडे, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, काळं मीठ, मीरपूड आणि डाळींबाचे दाणे इतकेच पदार्थ लागतात. मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. एका बाऊलमध्ये दही, कांदा, टोमॅटो, मिरचीचे तुकडे, मीठ आणि मिरपूड घालायचे आणि त्यामध्ये भाजलेले मखाने घालून हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि डाळींबाचे दाणे घालायचे.  

मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे (Benefits of eating Makhana)

- मखानामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मखाना इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जातात.

- मखानामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.

- आजारी माणसाला मखाना निखमितपणे खायला दिल्यास अंगात ताकद येते.अशक्तपणा दूर करण्यासाठी मखाना अतिशय पौष्टिक आहे.

- वेटलॉससाठी मखाना हा एक उत्तम पर्याय आहे. कारण काही अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की मखानामध्ये असणारे काही घटक शरीरातील चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे वजन घटवायचे आहे, त्यांनी नियमितपणे मखाना खावा.

- मखाना नियमित खाल्ल्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होतो.

- अंगातील उष्णता वाढल्यास मखाना खावा.

- मखाना खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.