मुलांना किंवा आपल्यालाही मधल्या वेळेत खायला काहीतरी पौष्टीक हवं असतं. अशावेळी काहीबाही तोंडात टाकण्यापेक्षा एखादा घरी केलेला पौष्टीक लाडू खाणे केव्हाही फायद्याचे ठरते. अशावेळी आपण ड्रायफ्रूट लाडू, बेसनाचे लाडू, रवा-नारळाचे, नाचणीचे, दाण्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू घरात आवर्जून करुन ठेवतो. काही वेळा घाईगडबड असेल तर आपल्याला हे लाडू करायचे ठरवूनही वेळ होत नाही. अशावेळी झटपट होणारे आणि भरपूर पोषण देतील असे मखाना-ड्रायफ्रूट लाडू केल्यास ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात (Benefits Of Makhana). लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच पौष्टीक तर होतातच पण पोटभरीच आणि खुसखुशीतही होतात. मखाना आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश असायला हवा त्यासाठीच मखाना लाडूची ही सोपी रेसिपी (Makhana Ladoo Recipe) ...
साहित्य -
१. तूप - ४ चमचे
२. मखाना - २ वाट्या
३. काजू - अर्धी वाटी
४. बदाम - अर्धी वाटी
५. खोबरं - १ वाटी किसलेले
६. गूळ - २ वाट्या
कृती -
१. कढईत तूप घालून त्यामध्ये मखाने चांगले परतून घ्यायचे.
२. परतलेले हे मखाने गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करुन घ्यायची.
३. काजू आणि बदाम यांचीही मिक्सरवर बारीक पूड करुन घ्यायची.
४. कढईमध्ये पुन्हा तूप घालून त्यामध्ये बारीक किसलेले खोबरे परतून घ्यायचे.
५. त्याच कढईत आधी बारीक केलेले मखाना आणि काजू-बदाम पावडर घालून सगळे नीट एकत्र करुन घ्यायचे.
६. हे सगळे मिश्रण एका भांड्याचत काढून घ्यायचे.
७. कढईत पुन्हा २ चमचे तूप घालून त्यात गूळ घालून त्या गुळाचा पाक करुन घ्यायचा.
८. हा पाक भांड्यात काढलेल्या मिश्रणावर घालून त्याचे एकसारखे लाडू वळायचे.
मखाना खाण्याचे फायदे
१. मखाना खाल्ल्याने शरीरास कॅल्शियम, मॅग्नेशियम, कर्बोदकं, लोह आणि प्रथिनं मिळतात. हे सर्व घटक शरीराचे पोषण होण्यासाठी उपयुक्त असल्याने मखाना अवश्य खायला हवेत.
२. मखाना ग्लुटेन फ्री आणि फायबरयुक्त असल्याने वजन कमी करण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच सकाळी मखान्याचे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर कमी भूक लागते.
३. शरीरातील कोलेस्टेराॅल, फॅटस आणि सोडियम हे घटक नियंत्रित राहण्यास मखाना खाणे फायदेशीर असते. हाडं मजबूत राहण्यासाठीही हा पदार्थ अतिशय उपयुक्त असतो.
४. मखान्यामध्ये असणारे ॲण्टिऑक्सिडण्टस आणि जीवाणूरोधक गुणधर्म यांचा त्वचा निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी मखाणे खाणे फायदेशीर असते.
५. मखानामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मखाना इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जातात. आजारी माणसाला मखाना निखमितपणे खायला दिल्यास अंगात ताकद येते व अशक्तपणा दूर होतो.