Join us  

उडपी हॉटेलसारखे सांबार घरच्याघरी बनवणे सोपे, फक्त ६ गोष्टी विसरू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 11:25 AM

6 Tips To Make Perfect Sambar : मस्त खमंग फोडणी दिलेलं सांबार सोबत खोबऱ्याची चटणी यांच्याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ खाणे व्यर्थ आहे.

आपण नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खातो. हे पदार्थ खाताना त्यांची लज्जत अजून वाढवायची असेल तर मस्त झणझणीत सांबार तर पाहिजेच. सांबार शिवाय इडली, मेदू वडा, डोसा अपूर्णच आहे. मस्त खमंग फोडणी दिलेलं सांबार सोबत खोबऱ्याची चटणी यांच्याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ खाणे व्यर्थ आहे. सांबार सर्वत्र भारतात पसंत केली जाणारी दक्षिण भारतीय डिश आहे. कुठल्याही उडपी हॉटेलमध्ये गेल्यावर त्या सांबाराची चव चाखल्यावर असे सांबार जर आपल्याला घरी बनवता आले तर... असा एक विचार मनात येऊन जातो. साऊथ इंडियन स्टाईल सांबार घरच्या घरी बनवण्यासाठी या ६ टीप्स समजून घेऊयात(6 Tips To Make Perfect Sambar).

काय काय करता येऊ शकत ?

१. हिंग - सांबार बनवताना आपण त्याला खमंग फोडणी देतो. ही फोडणी देताना त्यात हिंग घालायला विसरू नका. हिंग घातल्यामुळे तुमच्या सांबाराला विशिष्ट्य चव, स्वाद प्राप्त होईल. हिंगाप्रमाणेच हळद, मिरची पावडर, धणे पावडर समप्रमाणात घालतल्यास तुमचे सांबार चवीला अजूनच छान होऊ शकते. 

२. कोथिंबीर - सांबाराला फोडणी देताना त्यात आपण भरपूर कढीपत्ता घालतो. कढीपत्त्यासोबतच सांबारामध्ये कोथिंबीरीचाही तितकाच वापर करावा. सांबाराला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करण्यापूर्वी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी यामुळे सांबार टेस्टी होण्यास मदत होईल. 

३. सांबार मसाला -  शक्यतो सांबार मसाला विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवावा. सांबार मसाला घरच्या घरी बनवण्यासाठी :- दोन वाट्या धणे, दोन वाट्या भरून सुक्या मिरच्या, दोन चमचे हिंगाची पूड, दोन चमचे हळद, दोन चमचे मिरे, दोन चमचे मोहरी, पाव वाटी जिरे, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, एक चमचा मेथी. हे सर्व जिन्नस किंचित गरम करून व कुटून मसाला तयार करावा व बरणीत भरून ठेवावा. हे जिन्नस भाजू नयेत. भाजल्यास मसाल्याला भाजका वास लागतो. घरी बनविलेल्या या सांबार मसाल्याने सांबारला एक प्रकारची पारंपरिक चव प्राप्त होते. 

४. योग्य डाळीची निवड करा - सांबार बनवण्यासाठी योग्य तूर डाळीची निवड करणे गरजेचे आहे. चविष्ट सांबार बनवण्यासाठी आकाराने लहान आणि चपट्या तूर डाळीचा वापर करावा. शक्यतो पॉलिश केलेली तूर डाळ घेणे टाळा यामुळे तुमच्या सांबाराची चव बिघडू शकते. 

५. चिंच - सांबार हे आंबट - गोड चवीचे असल्याचं खायला चटकदार लागते. सांबाराला परफेक्ट आंबट - गोड चव येण्यासाठी चिंचेचा वापर करावा. चिंच किंवा चिंचेचे कोळ वापरताना नेहमी नवीन चिंच घ्यावीत. चिंचेचे साल गडद आणि हाताला चिकट लागतील अशी जुनी चिंच वापरू नका. 

६. सांबार मधील भाज्या - सांबार बनवताना आपण त्यात भोपळा, वांग, शेवग्याची शेंग यांसारख्या भाज्या घालून ते अधिक चविष्ट करतो. परंतु या भाज्या घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, या भाज्या जास्त शिजवू नका. जास्त शिजवल्याने या भाज्या डाळीमध्ये विरघळून जातील. तसेच या भाज्यांचे तुकडे करताना ते मध्यम आकाराचे करावे. एकदम लहान तुकडे करू नयेत.   

  

टॅग्स :अन्नकिचन टिप्स