अभिनेत्रींची फीगर, त्यांचे सौंदर्य आपण पाहतो आणि आपणही तसे दिसावे किंवा असावे असे आपल्याला अनेकदा वाटून जाते. मेकअपमुळे त्या इतक्या सुंदर दिसतात हे जरी खरे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि त्यांचा एकूण फिटनेस यामागे त्यांचा आहार आणि व्यायाम यांचाही मोठा वाटा असतो. बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री घरी केलेले साधे आणि पौष्टीक पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. इतकेच नाही तर या अभिनेत्री नियमितपणे व्यायाम करुन आपला फिटनेसही जपतात. मलाईका अरोरा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून वयाच्या ४८ व्या वर्षीही तिचे वय तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. यामागे नेमके काय कारण आहे हे तिने एका पोस्टमधून उलगडले आहे.
मलाईकाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यामध्ये तिने आपल्या लंच प्लेटचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये मलाईका दही भात हा पारंपरिक पदार्थ आवडीने खात असल्याचे दिसत आहे. ‘कर्ड राईस फॉर द विन’ अशी कॅप्शन देत मलाईकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या दही भाताचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो अतिशय आकर्षक असून या दही भाताला लाल मिरची, कडीपत्ता आणि दाण्यांची फोडणी दिल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असाताना दही भात हा अतिशय उत्तम आहार ठरु शकतो. त्यामुळे दुपारच्या जेवणात दही भाताचा समावेश करणे आरोग्यासाठी चांगले असते असे आहारतज्ज्ञ सांगतात. पाहूयात दही भात खाण्याचे फायदे
१. शरीराचं तापमान कमी होतं
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरील तापमानामुळे आपल्या शरीराचे तापमानही वाढलेले असते. दही शरीरासाठी थंड असल्याने शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी दही भात उपयुक्त ठरतो. दह्यामध्ये कॅल्शियमबरोबरच प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्याने शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी दही भाताचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
२. पचनशक्ती सुधारते
आपल्याकडे जेवणाच्या शेवटी दही भात खाण्याची पद्धत पूर्वी होती. याचे कारण खाल्लेले अन्न चांगले पचण्यासाठी दही आणि भात हे चांगले कॉम्बिनेशन मानले जाते. आपल्याला अनेकदा अॅसिडीटी, गॅसेस, अपचन असे त्रास होतात. मात्र दही भाताचा आहारात समावेश केल्यास हे त्रास कमी होण्यास मदत होते. जुलाब झाले असल्यासही दही भात उत्तम उपाय ठरतो.
३. प्रतिकारशक्ती वाढते
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटीक्स आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात, यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि विविध आजारांशी लढण्याची शरीराची ताकद वाढते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी आणि ताण दूर करण्यासाठीही दही भात खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.