उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन, आंबा असला की आपल्याला बाकी काहीच लागत नाही. आमरस, आंब्याचे आईस्क्रीम, मिल्क शेक असे सतत काही ना काही केले जाते. कधी आंबा घालून शिरा तर कधी आणखी काही. पण आंबा आणि नारळाची पारंपरिक कोकणी पद्धतीची वडी आपण करतोच असे नाही. अगदी झटपट होणारी, चविष्ट अशी ही रेसिपी करण्यासाठी फारसे सामानही लागत नाही. मात्र जेवणात किंवा मधल्या वेळेला गोड काही खावेसे वाटले तर पटकन तोंडात टाकता येईल अशी ही वडी एकदा नक्की ट्राय करा. घरी पटकन कोणी पाहुणे आले आणि डीशमध्ये गोड द्यायचे असेल तरी ही वडी चांगला पर्याय ठरु शकते. फक्त १ आंबा आणि नारळाचा चव यांपासून होणारी ही वडी कशी करायची पाहूया (Mango Coconut Wadi Recipe)...
साहित्य -
१. आंब्याचा रस - १ आंब्याचा
२. तूप - २ चमचे
३. ओलं खोबरं - ३ वाट्या
४. साखर - १.५ वाटी
५. साय किंवा मिल्क पावडर - २ ते ३ चमचे
६. सुकामेवा - आवडीप्रमाणे
कृती -
१. नारळाचा चव काढून घ्यावा, यामध्ये शक्यतो वाटीच्या खालचा चॉकलेटी भाग येणार नाही असे पाहावे.
२. आंब्याचा रस काढून तो मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावा.
३. एका कढईत तूप घालून यामध्ये नारळाचा चव चांगला सोनेरी रंग येईपर्यंत साधारण ५ मिनीटे परतून घ्यावा.
४. नंतर साखर आणि साय किंवा मिल्क पावडर घालून पुन्हा चांगले परतून घ्यायचे.
५. आंब्याचा रस घालून सगळे एकजीव करुन २ मिनीटे पुन्हा परतून घ्या.
६. ताटाला तूप लावून हे मिश्रण गरम असतानाच ताटात ओता आणि वाटीने एकसारखे पसरवा.
७. साधारण २ तास हे ताट गार होऊद्या, त्यानंतर सुरीने वड्या पाडा.
८. मग आवडीप्रमाणे पिस्ते, काजू,बदाम यांचे काप करुन या वड्यांवर लावा आणि वड्या पुन्हा गार करायला ठेवा.
९. साधारण तासाभरात वड्या चांगल्या सेट होतील आणि नीट निघतील.