Join us  

घरीच करा पार्लरसारखे परफेक्ट मँगो आईस्क्रीम, घ्या झटपट, सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 10:16 AM

Mango Ice-cream Recipe : कमीत कमी स्टेप्समध्ये आणि पदार्थांमध्ये सहज करता येणारी मँगो आईस्क्रीम रेसिपी...

उन्हाळा म्हटला की अंगाची होणारी लाहीलाही आलीच. यात आंबा म्हणजे स्वर्गसुख. उन्हामुळे आलेला थकवा भरुन निघण्यासाठी तसेच एनर्जी बूस्टर असलेला हा आंबा किती खाऊ आणि किती नको असे होऊन जाते. मग आंबा कापून खाण्याबरोबरच आंब्याचा रस, शिरा, मिल्क शेक असे काही ना काही आपण सर्रास बनवतो. त्याचप्रमाणे अगदी कमीत कमी पदार्थांमध्ये आणि झटपट होणारे असे मँगो आईस्क्रीमही एकदा आवर्जून ट्राय करायला हवे. परफेक्ट विकतच्या आईस्क्रीमसारखे टेक्शचर असणारे हे आईस्क्रीम उन्हामुळे झालेली लाहीलाही तर कमी करतेच पण इतके छान होते की ते होममेड आहे अशी शंकाही येणार नाही. चला तर पाहूयात कमीत कमी स्टेप्समध्ये आणि पदार्थांमध्ये सहज करता येणारी मँगो आईस्क्रीम रेसिपी (Mango Ice-cream Recipe)...

साहित्य 

१. आंब्याचा रस - १ कप (हापूस आंब्याचा असेल तर जास्त चांगले)

२. मिल्क पावडर - १ कप

३. दूध - १ कप 

(Image : Google)

४. साय - १ कप (यामध्ये बाजारात मिळणारे तयार क्रिमही वापरु शकता.)

५. पिठीसाखर - ४ ते ५ चमचे 

६. आंब्याच्या फोडी - १ वाटी 

कृती -

१. मिल्क पावडर, दूध, साय, आंब्याचा रस या सगळ्या गोष्टी एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

२. यामध्ये आवश्यकतेनुसार पिठीसाखर घाला.

३. एका प्लास्टीकच्या डब्यात हे मिश्रण ओतून  फ्रिजरमध्ये ठेवा.

४. ७ ते ८ तासांत आईस्क्रीम चांगले सेट होईल. तेव्हा ते फ्रिजरमधून बाहेर काढून ठेवा. 

५. त्यानंतर हे आईस्क्रीम थोडे वितळेल, तेव्हा त्याचे पुन्हा तुकडे करा.

६. पुन्हा एकदा हे आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या. 

७. हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवा, मात्र यावेळी त्यावर आंब्याच्या बारीक फोडी घालायला विसरु नका.

८. साधारण ७ ते ८ तासांनी सेट झाल्यावर या मँगो आईस्क्रीमचा मनसोक्त आनंद घ्या.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल