Join us  

Mango Jam Recipe : वर्षभर टिकेल असा आंब्याचा जाम, करायला सोपा-आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी करा खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 1:52 PM

Mango Jam Recipe : ब्रेडला लावून किंवा एखादवेळी पोळीसोबत खाल्ला जाणारा जाम विकत आणण्यापेक्षा घरीच करुन पाहूया की...

ठळक मुद्देविकतच्या जाममध्ये असणाऱ्या रासायनिक पदार्थांपासून वाचायचे असेल तर घरच्या घरी करुन पाहा झटपट मँगो जामलहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि पोळी, ब्रेड कशासोबतही चालेल अशा जामच्या खास २ रेसिपी

आंबा म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण. उन्हाळ्याच्या दिवसांत किती आंबा खाऊ आणि किती नको असे आपल्याला होते. दिड ते दोन महिनेच येणारा हा फळांचा राजा कितीही महाग असला तरी घरोघरी आवर्जून खाल्ला जातो. भरपूर एनर्जी देणारे आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेले या फळातून शरीराला बरेच उपयुक्त घटक मिळतात. आंब्याच्या सिझनमध्ये आंब्याचा शिरा, आंब्याचा रस, आंब्याचे आइस्क्रीम, मिल्क शेक यांसारखे अनेक पदार्थ आपण करतो आणि जेवणाची लज्जत वाढवतो. (Mango Jam Recipe) पण सिझन जसा संपत येतो तसे आपण हा आंबा कसा साठवून ठेवता येईल किंवा त्याचे कोणते पदार्थ करता येतील याचा विचार करतो. 

(Image : Google)

कैरीचे लोणचे, मेथांबा, साखरांबा यांसारख्या गोष्टी आवर्जून केल्या जातात. पण आंब्याची जेली किंवा जाम आपण करतोच असे नाही. घाईच्या वेळी नाश्ता म्हणून कधी ब्रेडला लावून हा जाम खाता येतो. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पोळीशीही हा जाम खाता येतो. इतकेच नाही तर हा जाम बराच काळ टिकत असल्याने अचानक घरी पाहुणे आले आणि गोड काही नसेल तर आपण गोड म्हणूनही तो वाढू शकतो. झटपट होणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही प्रिझर्वेटीव्ह नसलेला आंब्याचा हा जाम कसा तयार करायचा ते पाहूया. कमीत कमी पदार्थांमध्ये होणारा हा चविष्ट जाम कसा तयार करायचा याच्या दोन पद्धती पाहूया...

१. तोतापुरी आंब्याचा फोडींचा जाम 

१. साधारणपणे जून महिना सुरू झाला की तोतापुरी आंबे बाजारात दिसायला लागतात. हा आंबा आकाराने मोठा असल्याने आणि कोय पातळ असल्याने यात बराच गर असतो. 

२. तोतापुरी आंब्याची साले काढून बारीक फोडी करुन घ्यायच्या

३. एका पातेल्यात आंब्याच्या फोडी ज्या प्रमाणात आहेत त्याहून थोडी कमी साखर घेऊन साखर बुडेल इतकेच पाणी घालून पाक करायचा.

४. पाक होत आला की त्यामध्ये या पिकलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. 

५. यामध्ये आवडीप्रमाणे केशर, वेलची पावडर घालून हे सगळे एकत्र चांगले शिजू द्यायचे. 

६. जाम एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गार झाल्यावर जाम एका कोरड्या बरणीत भरुन फ्रिजमध्ये ठेवायच.

२. हापूस आंब्याचा जाम 

१. हापूस आंबा म्हणजे आंब्यातील सर्वात जास्त भाव असणारी जात. साधारण ३ ते ४ आंब्यांच्या फोडी करुन त्या मिक्सरमधून फिरवून त्याचा रस करायचा. 

२. गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये हा रस घालायचा. त्यामध्ये एक वाटी साखर, १ ते २ चमचे लिंबाचा रस आणि अर्धी वाटी पाणी घालून सगळे मध्यम आचेवर शिजवायचे. 

(Image : Google)

३. साधारणपणे २० मिनीटे हे सगळे मिश्रण सतत ढवळत राहायचे म्हणजे हे चांगले शिजण्यास आणि एकजीव होण्यास मदत होते. पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि जाम घट्ट होईपर्यंत परतायचे. 

४. काही वेळाने या जामचा रंग बदलतो, त्यावर एकप्रकारची ग्लेझ येते. अशावेळी तो काढून एका बरणीत ठेवावा. हा जाम, ब्रेड, पोळी कशासोबतही अतिशय छान लागतो. 

 

टॅग्स :अन्नआंबापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.