Join us  

आंबे भरपूर विकत आणले, खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवावेत का? तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2022 6:15 PM

आंबा बाहेर ठेवला तर खराब होतो नि फ्रिजमध्ये ठेवला तर खराब लागतो, हे असं का, तज्ज्ञ काय म्हणतात?

ठळक मुद्देआंबा या फळाला गारवा अजिबात सहन होत नाही.आंब्याप्रमाणेच आंब्याचा रस देखील तापमानाला संवेदनशील असतो.फ्रिजमध्ये आंबा साठवण्याची पध्दत वेगळी आहे. 

 फळांचा राजा घरात आणल्यावर तो कुठे आणि कसा ठेवावा हा मोठाच प्रश्न.  आंबे थोडे आणले असतील तर खाऊन लगेच संपतात. पण आंब्याची पेटी आणलेली असली तर मात्र आंबे काही लवकर संपत नाही. आंबे टिकावेत म्हणून फ्रिजमध्ये ठेवले जातात. आंब्याचा रस काढून तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. पण यामुळे आंब्याची चव, रंग, पोत सगळंच बिघडलेलं आढळतं. मोठ्या हौसेन आणि मोलानं आणलेला आंबा चवीनं खाताना मात्र कपाळावर आठ्या पडतात. आंबा / आंब्याचा रस साठवून ठेवण्याची पध्दत चुकल्याचं लक्षात येतं. आंबा फ्रिजमध्ये ठेवून न खाण्यामागे आयुर्वेदानुसार विशिष्ट कारणं आहेत. वैद्य राजश्री कुलकर्णी ( एमडी आयुर्वेद, नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ) यांनी आंबे फ्रिजमध्ये का ठेवू नये यामागील कारणं सविस्तर उलगडून सांगितली आहेत. आंब्याचा पोत, गंध, चव याचा मनमुराद आस्वाद घेता येण्यासाठी ही कारणं समजून घेणं आवश्यक आहे. 

Image: Google

फ्रिजमध्ये आंबे का ठेवू नये?

1. काही फळं तापमानाला खूप संवेदनशील असतात. आंब्याला 'चिल्ड सेन्सिटिव्ह' असं म्हटलं जातं. आंब्याला गारवा सहन होत नाही. आंब्याला अंगचीच उष्णता खूप आहे. अढी लावलेला/ पेटीत ठेवलेला आंबा जर बाहेर काढून बघितला तर तो हाताना गरम लागतो. आंब्यात सतत पिकण्याची प्रक्रिया चालू असते त्यामुळे आंब्यात अंतर्गत उष्णता खूप असते. त्यामुळे आंबा जर फ्रिजमध्ये ठेवला तर त्याचा स्वाद बिघडतो, रंग बदलतो आणि त्याचे गुणधर्म देखील बदलतात. 

2. बेरीज स्वरुपातील नाजूक फळं असतात ज्यांना उष्णता अजिबातच सहन होत नाही त्यांना फ्रिजमध्ये ठेवावं लागतं. पण आंबा हे फळ असं आहे ज्याला नैसर्गिक तापमानात ठेवलं, सामान्य तापमानात पिकू दिलं तितका त्याचा रंग हिरवेपणापासून केशरीपणापर्यंत जातो . आंब्याला चांगला गोडवा येतो.  पण आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास आंब्याचे सालं काळं पडतं, आंबा सुरकततो. आंब्याच्या गराची चव बदलते.

Image: Google

3. आंब्याप्रमाणेच आंब्याचा रस देखील तापमानाला संवेदनशील असतो. आंबा जर फ्रिजमध्ये ठेवायचा असला तर तो आंब्याचं साल काढून गराच्या फोडी कराव्यात. या फोडी काचेच्या हवाबंद बरणीत ठेवल्या किंवा आंब्याचा रस हवाबंद बाटलीत काढून फ्रिजमध्ये ठेवला तर टिकतो.

4. धातूच्या भांड्यात केवळ आंब्याचाच नाही तर कोणत्याही फळाचा रस ठेवला तर त्यावर धातूची रासायनिक प्रक्रिया होवून रस काळा पडतो, त्याची चव बदलते. आंब्याचा रस हा फ्रिजमध्ये ठेवायचा असल्यास काचेच्या बाटलीत किंवा भांड्यातच ठेवावा. अनेकजण आंब्याचा रस काढून तो प्लॅस्टिक कंटेनरमध्ये ठेवतात, तर ही बाबही आरोग्यदृष्ट्या चुकीची आहे.    

टॅग्स :अन्नकिचन टिप्सआंबा