Join us  

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : नैवेद्यासाठी करा ३ प्रकारच्या खिरी, झटपट आणि पौष्टिक खिरींचा उत्तम प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2024 9:25 AM

Margashirsh Gururwar Special Easy Sweet Naivedya options : बाहेरुन विकतचे काही आणण्यापेक्षा देवीसाठी घरी आपल्या हाताने काही करायचे असेल तर...

मार्गशीर्ष महिन्याचे व्रत म्हणजे महिलांसाठी अतिशय भावनिक आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. गुरुवारचे हे व्रत केल्याने आपल्याकडे समृद्धी येते असा समज असल्याने अनेक महिला अतिशय मनोभावे हे व्रत करतात. देवीची आराधना, पोथी वाचन, पूजा-आरती, दिवसभराचा उपवास करुन रात्री हा उपवास सोडला जातो. उपवास सोडायचा म्हणजे चतुर्थीला ज्याप्रमाणे गणपतीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे देवीलाही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडण्याची पद्धत आहे. बाहेरुन विकतचे काही आणण्यापेक्षा देवीसाठी घरी आपल्या हाताने काही करावे असे महिलांना वाटते. पण दर गुरुवारी वेगळं आणि झटपट होईल असं काय करता येईल ते मात्र अनेकींना सुचत नाही. म्हणूनच झटपट होतील असे नैवेद्याचे ३ सोपे पर्याय आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हे नैवेद्य तयार होत असल्याने त्यासाठी फारशी तयारीही लागत नाही (Margashirsh Gururwar Special Easy Sweet Naivedya options). 

(Image : Google)

१. दलियाची खीर

गव्हाचा दलिया स्वच्छ धुवून कुकरला व्यवस्थित शिजवून घ्यावा. त्यानंतर कढईत तूप घालून त्यावर हा दलिया आणि साखर घालावी. थोडे दूध घालून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहावे. आवडीनुसार वेलची पूड, जायफळ पूड, सुकामेवा घालावा. ही खीर साखरेऐवजी गूळाची केली तरी छान होते. मात्र गूळ असताना दूध अंदाज घेत घालावे म्हणजे फुटण्याची भिती नसते. ही खीर लवकर घट्टसर होत असल्याने पानात घेतल्यावर वरुन पुन्हा गरम दूध घालावे. 

२. रव्याची खीर

आपण रव्याचा शिरा, उपमा, सांजोऱ्या असे पदार्थ करतो पण रव्याची खीर फारशी करत नाही. पण जाड रव्याची खीर फार छान लागते. रवा तूपावर खरपूस वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये दूध आणि साखर घालून सगळे चांगले एकजीव शिजवायचे. यातही आवडीनुसार सुकामेवा, वेलची पूड घातल्यास छान स्वाद येतो. खिरीमध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा चव, केशर हेही घालू शकतो. 

३. तांदळाची खीर 

करायला अतिशय सोपी आणि चविष्ट अशी ही खीर एरवी जास्त केली जात नाही. पण गुरुवारच्या व्रताच्या निमित्ताने आपण ही खीर नक्की करु शकतो. तांदूळ भाजून मिक्सरवर बारीक करुन घ्यावेत. नंतर तूपावर चांगले भाजून अंदाज घेत पाणी घालावे. तांदूळ भरपूर फुगतो त्यामुळे घेताना अर्धी ते १ वाटीच्याच मापाने घ्यावेत. दूध आवडीनुसार खवा घालून साखर घालावी आणि चांगले शिजू द्यावे. ही खीर गरम असतानाच छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.