अनेक महिला मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीची मनोभावे उपासना करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून मग सायंकाळी देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो. बहुतांश महिला मार्गशीर्ष गुरुवारी आवर्जून तांदळाच्या खिरीचा नैवेद्य करतात (Margashirsh Guruvar Naivedya). पण कधी ही खीर खूपच घट्ट होते तर कधी अगदीच पातळ होते. कधी खिरीला तांदळाचा उग्र वास लागतो तर कधी आपण गोड भात खात आहोत की काय असं वाटतं. असं काहीही तुमच्या बाबतीतही होत असेल तर तांदळाची खीर कशी करावी, याची ही खास रेसिपी एकदा बघाच..(tandalachi kheer recipe in Marathi)
तांदळाची खीर करण्याची रेसिपी
साहित्य
अर्धा कप इंद्रायणी, आंबेमोहर किंवा यासारखा सुगंधी तांदूळ
पाव कप खोवलेलं नारळ
३ ते ४ चमचे साजूक तूप
तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे काप २ ते ३ टेबलस्पून
१ ते सव्वा लीटर दूध
अर्धा ते पाऊण कप साखर
१ टीस्पून वेलची पूड
१ टीस्पून जायफळ पूड
७ ते ८ केशराच्या काड्या
कृती
सगळ्यात आधी तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यातलं पाणी पुर्णपणे निथळण्यासाठी साधारण १० ते १५ मिनिटे ते पसरवून ठेवा.
रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल
त्यानंतर तांदळाचा ओलसरपणा कमी झाला की ते मिक्सरमधून फिरवून थोडे जाडेभरडे वाटून घ्या. अगदी बारीक पावडर करू नये.
कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात तूप टाका आणि बारीक केलेले तांदूळ छान सोनेरी, लालसर होईपर्यंत परतून घ्या.
यानंतर तांदळामध्ये हळू हळू कोमट दूध टाका. दूध टाकत असताना एका हाताने कढईतले तांदूळ हलवत राहा. त्यामुळे मग तांदळाचे गोळे होणार नाहीत.
गुडघेदुखीने हैराण आहात? घरीच तयार करा 'हे' खास तेल- गुडघ्यांचं दुखणं थांबून धावाल जोरात...
दूध टाकल्यानंतर १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर खीर चांगली उकळू द्या. खीर उकळत असताना अधून मधून सतत हलवत राहा. यानंतर दूध थोडेसे आटले की त्यात साखर, केशर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि सुकामेव्याचे काप टाका. पुन्हा काही मिनिटांसाठी खीर उकळू द्या. साधारण ५ ते १० मिनिटांनी गॅस बंद करा.. गरमागरम तांदळाची खीर तयार..