गौरी गणपती असो किंवा नवरात्री या काळात एकूणच सणांचे वातावऱण असते आणि काही सुट्ट्याही असतात. त्यामुळे देवा धर्माचे करताना या सणावारांना आपली तितकी ओढाताण होत नाही. पण मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे ऐन गुरुवारी म्हणजे आठवड्याच्या वारी येत असल्याने महिलांची चांगलीच तारांबळ होताना दिसते. सकाळी देवीचे व्रत, पोथी वाचन, पूजा अर्चा आणि मग दिवसभराचा उपवास आणि ऑफीस. त्यात थंडीचे दिवस असल्याने या काळात जास्त भूक लागते (Margashirsh Gurwar devi vrat Naivedya Cooking tips) .
संध्याकाळी उपवास सोडायचा असल्याने ऑफीसमधून दमून आल्यानंतर संध्याकाळी ताजा- साग्रसंगीत नैवेद्य करावा लागतो. यामध्ये भाज्या, भात-वरण, चटणी, कोशिंबीर, गोडाचे असे सगळेच करायचे असल्याने महिलांची दमणूक होऊन जाते. स्वयंपाक करायचा याचा दिवसभर असणारा ताण वेगळाच असतो. पण नैवेद्याचा हा स्वयंपाक परीपूर्ण होतानाच झटपट होण्यासाठी काही गोष्टींचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागते. थोडं स्मार्टली काम केलं तर व्रत वैकल्यांचा ताण न येता ती आपण आनंदानी आणि जास्त भक्तीभावाने करु शकतो. पाहूया नैवेद्याचा स्वयंपाक करण्याच्या ५ सोप्या टिप्स...
१. पोळ्या किंवा पुऱ्या यांच्यासाठी लागणारी कणीक सकाळीच मळून ठेवू शकतो. आपल्याला उपवास असला तरी सकाळी इतरांसाठी आपण स्वयंपाक करणारच असतो. त्याचवेळी थोडी जास्तीची कणीक मळून ठेवल्यास स्वयंपाकाचा वेळ नक्कीच वाचू शकतो.
२. भाज्या चिरुन ठेवणे, भाज्यांसाठी लागणारे वाटण, दाण्याचा कूट यांची तयारी आधीच करुन ठेवलेली असेल तर ऐनवेळी भाजीसाठी जास्त वेळ लागत नाही. नैवेद्य असताना शक्यतो बटाटा, कोबी, फ्लॉवर-मटार अशा सोप्या भाज्या करायच्या जेणेकरुन जास्त वेळ जात नाही.
३. कोशिंबीरीच्या ऐवजी सॅलेड नुसते चिरुन घेतले तरी चालू शकते. किंवा गाजर, कोबी, बीट, काकडी यांपैकी ज्याची कोशिंबीर करायची ते किसायचे आणि त्यात फक्त मीठ, साखर, दाण्याचा कूट घालायचा. अशी साधी कोशिंबीरही छान लागते.
४. साईड डीश म्हणून भजी, वडे किंवा आणखी काही करत बसण्यापेक्षा पापड्या किंवा कुरडया तळणे हा सोपा उपाय असतो. आपल्याकडे वाळवणांपैकी काही ना काही नक्की उपलब्ध असते.
५. गोडाचा पदार्थ करायला वेळ नसेल तर आपण तो विकतही आणू शकतो. पण नैवेद्य असल्याने घरीच करायचा असेल तर दलियाची खीर, गुळाचा शीरा, सुधारस, तांदळाची किंवा रव्याची खीर असे झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे पदार्थ केल्यास वेळ वाचण्यास नक्कीच मदत होते.