मार्गशीर्ष महिना सुरु झाला आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. उपवासात आपण नेहमी भगर अथवा साबुदाण्याची खिचडी खातो. काहींनी साबुदाण्याची खिचडी आवडते. तर काहींना नाही. जर उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर जरा हटके रेसिपी घरच्या घरी ट्राय करा. उपवासासाठी लागणाऱ्या साहित्यात आपण विविध पदार्थ बनवू शकता. जे चवीला उत्कृष्ट आणि चमचमीत लागते. आज आपण गुरुवार स्पेशल इडली सांबार आणि कच्च्या केळ्याचे कबाब बनवण्याची झटपट रेसिपी जाणून घेणार आहोत.
उपवास स्पेशल इडली सांबार
इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य
वरीचे तांदूळ - १ वाटी
साबुदाण्याचे पीठ - १ वाटी
बेकिंग सोडा
मीठ
बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची
अर्धवट कुटलेले जिरे
कृती
सर्वप्रथम एका बाउलमध्ये वरीचे तांदूळ आणि दुसऱ्या बाउलमध्ये साबुदाणा पीठ घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित दोन तास भिजत ठेवा. भगरीतले पाणी काढून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या, यासह साबुदाण्याचीही पेस्ट करा. या दोन्ही पेस्ट एकत्र करून त्यात मीठ, जिरे आणि बारीक चिरून घेतलेली मिरची घाला. शेवटी थोडेसे इनो अथवा बेकिंग सोडा मिक्स करा.
इडली पात्रात पाणी घालून नंतर त्यामध्ये पाणी उकळू द्या. इडलीच्या भांड्याला तेलाचा हात लावा आणि हे सारण त्यामध्ये भरा. साधारण 10-15 मिनिटे इडली चांगली शिजवून घ्या, नंतर झाकण उघडून इडल्या काढून घ्या.
सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य
शेंगदाणे
1 हिरवी मिरची
1 चमचा आलं
1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
1 चमचा चिंचेचा कोळ
पाव चमचे जिरे
पाव वाटी उकडलेले बटाट्याचे तुकडे
पाव चमचा तिखट
मीठ आणि गूळ चवीनुसार
तेल
जिरे
कृती
सर्वप्रथम एक तास शेंगदाणे पाण्यात टाकून भिजत ठेवा. त्यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि जिरं टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या. एका कढईमध्ये तेल तापवा, त्यात हिरवी मिरची आणि आलं पेस्ट टाका. त्यानंतर लाल तिखट घालून परतून घ्या. त्यात शेंगदाण्याची पेस्ट टाका. आणि मिश्रण चांगले मिक्स करा. यानंतर थोडे पाणी टाकून एक उकळी येऊ द्या. त्यात उकडून घेतलेले बटाट्याचे फोड घाला. वरून चिंचेचा कोळ, गुळ, आणि चवीनुसार मीठ घाला आणि एक उकळी येऊ द्या. अशा प्रकारे उपवास स्पेशल इडली आणि सांबार रेडी.
कच्च्या केळ्याचे कबाब
कच्ची केळी
हिरवी मिरची
धणे पावडर
सैंधव मीठ
तेल अथवा तूप
हळद
काळी मिरी पावडर
शिंगाड्याचे पीठ
कृती
सर्वप्रथम, कच्च्या केळीला हाताला तेल लावून चांगले सोलून घ्या. साल काढल्यानंतर केळीचे ३-४ काप करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा त्यात कच्च्या केळ्याचे काप टाका. शिजल्यानंतर केळी बाहेर काढा. त्यात हिरव्या मिरच्या, एक वाटी शिंगाड्याचं पीठ, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, हळद, काळी मिरी पावडर टाका. आणि हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
हे मिश्रण मळलेल्या पीठासारखे दिसू लागले, की त्यावर झाकण ठेऊन थोडावेळ बाजूला ठेवून द्या. नंतर कढईत तेल अथवा तूप टाकून गरम करायला ठेवा. एकीकडे पीठाचे चांगले गोलाकार देऊन छोटे टिक्की तयार करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हे टिक्की चांगले सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे कच्च्या केळ्याचे कबाब रेडी झाले आहेत. हे कबाब खाल्ल्याने फक्त भूक भागणार नसून, यातून मिळणारे पौष्टीक तत्वे एनर्जी लेव्हलही वाढवते.