मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे देवीची पूजा करण्याचा दिवस. महिला वर्गामध्ये या उपवासाचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी देवीची मनोभावे पूजाअर्चा करुन दिवसभर उपवास धरला जातो. संध्याकाळी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो. आता दर गुरुवारी गोडाचे काय करायचे असा प्रश्न तमाम महिलांपुढे पडतो. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून करु शकतो आणि सगळ्यांना आवडेल असा प्रसाद केला तर? त्यासाठीच आज आपण गुळाच्या शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत. यामध्ये गूळ, सुकामेवा, तूप असल्याने थंडीसाठीही हा प्रसाद आरोग्यदायी असतो आणि लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तीही आवडीने हा शिरा खाऊ शकतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करुन बघा. पाहूया झटपट होणाऱ्या या गुळाच्या शिऱ्याची सोपी रेसिपी (Margashirsha Guruwar Sweet Gul Shira Recipe)...
साहित्य -
१. जाड रवा - १ वाटी
२. तूप - पाव वाटी
३. गूळ - पाऊण वाटी
४. काजू, बदाम, पिस्ते - प्रत्येकी ५
५. वेलची पूड - पाव चमचा
कृती -
१. कढईत तूप घालून रवा चांगला खरपूस भाजून घ्यावा.
२. गूळ बारीक किसून किंवा चिरुन या रव्यामध्ये घालावा आणि अंदाजाने पाणी घालावे.
३. नेहमी आपण शिऱ्याला दूध वापरतो पण गुळामुळे दूध फुटण्याची शक्यता असल्याने पाणी वापरणे केव्हाही चांगले.
४. हे सगळे एकजीव करुन वाटल्यास बाजूने आणखी तूप सोडावे.
५. सुकामेवा थोडा भाजून घेऊन किंवा पाण्यात भिजवून मग त्याचे पातळ काप करावेत. हे काप शिरा करताना घातले तरी चालतात किंवा वरुन डेकोरेशनसाठीही वापरु शकतो.
६. वेलची पूड घालावी म्हणजे शिऱ्याला छान फ्लेवर येतो. चांगली वाफ आली की रवा चांगला फुगतो, त्यात साखरेपेक्षा गुळाच्या शिऱ्याची चव थोडी वेगळी आणि छान लागते.
७. आवडीनुसार यामध्ये आपण खसखस, केशर, मनुके घालू शकतो.