मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या महिन्यात अनेक महिला महालक्ष्मी देवीचं व्रत करतात. पुर्ण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी उपवास धरला जातो. या दिवशी महालक्ष्मी मातेचं व्रत धरून सायंकाळी देवीला नैवैद्य दाखवून उपवास सोडण्यात येतो. उपवासाला अनेक जण वरीच्या तांदळाचे भात अथवा साबुदाण्याची खिचडी बनवतात. मात्र त्याव्यतिरिक्त आपण याच साहित्यांचा वापर करून वेगळी डिश बनवून पाहू शकता. आज आपण अशा दोन रेसिपी जाणून घेणार आहोत जे खायला चविष्ट तर लागतेच, यासह शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. घरच्या साहित्यात बनणाऱ्या या रेसिपी सोपी आणि झटपट बनते.
उपवासाचे अप्पे
उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
वरीच्या तांदुळाचे पीठ - १ वाटी
बटाटे - ३
मिरची - बारीक चिरून घेणे
जीरा
मीठ
बेकिंग पावडर
दही
तेल
कृती
सर्वप्रथम वरीचे तांदूळ पाण्यात एक तास भिजत घाला. त्यानंतर हे तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्या. हे मिश्रण वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात उकडून घेतलेला बटाटा, मिरची, जिरं, बेकिंग पावडर अर्धा चमचा, दही, आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. या मिश्रणावर प्लेट झाकून २० मिनिटे बाजूला ठेवून द्या. आता अप्पे पात्रात तेल घालून त्यात हे मिश्रण टाकून शिजवून घ्या. जशाप्रकारे अप्पे तयार करता, त्याचप्रकारे हे उपवासाचे अप्पे तयार करा. हे अप्पे आपण शेंगदाण्याची चटणी अथवा गोड दहीसह खाऊ शकता.
उपवासाचे घावण
उपवासाचे घावण बनवण्यासाठी लागणारं साहित्य
वरी तांदूळ - १ वाटी
साबुदाणा - १ वाटी
हिरवी मिरची - बारीक चिरून घेणे
नारळाचे कीस
शेंगदाण्याचं कूट
मीठ
तूप
कृती
साबुदाणा आणि वरीचे तांदूळ एकत्र पाण्यात भिजत घालून ठेवा. साधरण ४ ते ५ तास चांगले भिजत ठेऊन द्या. भिजल्यानंतर साबुदाणा आणि वरीचे तांदूळ एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या. वाटत असतानाच त्यात मिरची, खोबरे, दाण्याचे कूट, आणि मीठ घालून पुन्हा मिश्रण वाटून घ्या. आपण नेहमीच्या घावनाला जशा प्रकारे वाटून घेतो, त्याच प्रमाणे या मिश्रणाचे वाटण तयार करावे. वाटल्यास पाणी देखील टाका. यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणे. नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्या. त्यात हे मिश्रण . जशा प्रकारे घावण तयार करता त्याच प्रकारे हे उपवाचे घावण तयार करावे. कडेने तूप सोडून कुरकुरीत घावण दोन्ही बाजूने भाजून घ्यावे. अशा प्रकारे घावण खाण्यास रेडी.