दसरा- दिवाळी या सणांच्या वेळी झेंडूंच्या फुलांना खूपच मान असतो. देवाला अर्पण करायला तसेच घरात, अंगणात किंवा पुजा असेल, तिथे डेकोरेशन करायलाही झेंडूची फुले वापरली जातात. झेंडूच्या फुलांची सजावट अतिशय शोभून तर दिसतेच, पण लगेचच ती जागा अतिशय पवित्र आणि मंगलदायी भासू लागते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या शुभ कार्यात, सणांमध्ये आपण घरात झेंडूची फुले हमखास आणतोच. या फुलांनी सजावट तर कराच, देवालाही ही फुले अर्पण करा. पण त्यासोबतच त्याचा मस्त, झकास चहा करूनही प्या.
Marigold Flower म्हणजेच झेंडूची फुले आरोग्यासाठी अतिशय उपयूक्त आहेत. आयुर्वेदामध्येही अनेक आजारांवर झेंडूच्या फुलांचा इलाज सांगितला आहे. झेंडूच्या फुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे थकवा, मनाचा आणि शरीरावर आलेला ताण घालविण्यासाठी झेंडूचा चहा अतिशय उपयुक्त ठरतो. जेव्हा खूप आळस आला आहे, असं वाटत असेल किंवा खूपच गळून गेल्यासारखं वाटत असेल, तेव्हा झेंडूचा चहा करून नक्कीच प्यायला हवा. कारण नॅचरल एनर्जी ड्रिंक म्हणून झेंडूचा चहा ओळखला जातो. झेंडूच्या फुलांचे सौंदर्याच्या दृष्टीनेही अनेक उपयोग आहेत.
झेंडूच्या फुलांच्या चहा पिण्याचे फायदे- मनावरचा तणाव घालविण्यासाठी झेंडूचा चहा उपयुक्त ठरतो.- अंगवार येणारी सूज कमी करण्यासाठी झेंडूचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.- वेटलॉस करण्यासाठी देखील झेंडूचा चहा प्यायला हवा, असे सांगण्यात येते. कारण शरीरातील अतिरिक्त चरबी घालविण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो.- दात दुखत असल्यास झेंडूचा चहा प्यावा किंवा त्याने गुळण्या कराव्यात.
कसा करायचा झेंडूचा चहा?हा चहा करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. यासाठी दोन ग्लास पाणी घ्या. हे पाणी उकळत असताना त्यात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका. साधारण एक ग्लास पाणी असेल तर दोन ते तीन टेबलस्पून एवढ्या झेंडूच्या पाकळ्या टाकाव्या. यानंतर पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरेल. साधारण पाणी उकळून अर्धे झाले की गॅस बंद करा. हे पाणी थोडंसं कोमट होऊ द्या. पाणी कोमट झालं की त्यात मध टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. अशा प्रकारे झेंडूचा गरमागरम चहा प्या आणि मस्त रिफ्रेश व्हा.
झेंडूचा चहा करताना ही काळजी घ्या- झेंडूचा चहा करायचा असेल, तर फुले अगदी ताजी असावीत. सुकलेल्या किंवा खूप दिवसांपासून फ्रिजमध्ये ठेवलेल्या फुलांचा चहा करू नये.- चहा करण्याआधी झेंडूची फुले व्यवस्थित धुवून घ्यावीत कारण फुलं जास्त दिवस टिकावीत, फ्रेश दिसावीत म्हणून त्याच्यावर अनेक रसायने फवारलेली असतात.