Join us  

मटारच्या सिझनमध्ये करा चमचमीत मटार कटलेट; ट्राय करा सोपी झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 10:58 AM

Matar Green Peas Cutlet Recipe : इतर भाज्या घातल्या तर मुलांसाठी हे कटलेट पौष्टीक ठरु शकतात.

ठळक मुद्देहे कटलेट ब्रेड स्लाईस, पोळीसोबत किंवा नुसतेही सॉस-चटणीसोबत चांगले लागतात.  घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे कटलेट आवडतात

थंडी संपायला अवघा महिना राहीला त्यामुळे आता बाजारात साधारण महिनाभर ताजे हिरवेगार मटार मिळतील. मटारचा सिझन असेल की आपण मटार उसळ, पावभाजी, मटार करंजी, मटार पुलाव असे काही ना काही आवर्जून करतो. यामध्ये मटारचा आणखी एक चविष्ट पदार्थ करता येऊ शकतो. तो म्हणजे मटारचे कटलेट. थंडीच्या दिवसांत हे कटलेट पोटभरीचे तर होतातच पण गरम असल्याने आवडीने खाल्लेही जातात. यामध्ये कोबी, बीट, गाजर यांसारख्या इतर भाज्या घातल्या तर मुलांसाठीही हे कटलेट पौष्टीक ठरु शकतात. अगदी झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडणारे हे कटलेट कसे करायचे पाहूया (Matar Green Peas Cutlet Recipe)...

साहित्य -

१. मटार - २ वाट्या 

२. बटाटे - २ 

३. ब्रेड - ४ ते ५ स्लाईस

(Image : Google)

४. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा 

५. धणे- जीरे पावडर - अर्धा चमचा 

६. लिंबाचा रस - १ चमचा 

७. कोबी, बीट, गाजर - १ वाटी किसलेले

८. मीठ - चवीनुसार 

९. साखर - अर्धा चमचा 

१०. तेल - अर्धी वाटी 

११. कोथिंबीर - अर्धी वाटी

कृती -

१. बटाटा आणि मटार कुकरमध्ये उकडून घ्यायचे.

२. बाहेर काढून हाताने थोडे स्मॅश करुन घ्यायचे.

३. ब्रेड मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. 

४. कोबी, गाजर, बीट, कॉर्न अशा घरात उपलब्ध असतील त्या भाज्या किसून घ्यायच्या.

५. एका बाऊलमध्ये मटार, बटाटा, किसलेल्या भाज्या, ब्रेडचा चुरा एकत्र करायचे. 

६. यामध्ये आलं-मिरची-लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, लिंबाचा रस, मीठ, साखर, कोथिंबीर घालून सगळे एकजीव करायचे.

७. हातावर गोल कटलेट थापून ते ब्रेडच्या चुऱ्यात घोळवाचे आणि तव्यावर तेल घालून शॅलो फ्राय करायचे.

८. हे कटलेट ब्रेड स्लाईस, पोळीसोबत किंवा नुसतेही सॉस-चटणीसोबत चांगले लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृती