Join us  

हिवाळा स्पेशल : हिरव्यागार ताज्या मटारची करंजी करताय ना? खुसखुशीत खंमग मटार करंजीची परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2022 4:03 PM

Winter specail Food : Matar Green Peas Karanji Easy Recipe : मैदा, विकतचे तेल यांपेक्षा घरी केलेली करंजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने आणि भरपूर खाऊ शकतात. How to make Matar Karanji?

ठळक मुद्देथंडीत मटारच्या सिझनमध्ये आवर्जून करायला हवा असा एक चविष्ट पदार्थया करंज्या गरमागरम चिंचेची चटणी, सॉस किंवा नुसत्याही खायला अतिशय छान लागतात.  

थंडीचा सिझन आला की बाजारात गाजर, मटार आणि इतरही भरपूर भाज्या दिसायला लागतात. हिरवागार मटार म्हणजे अनेकांचा आवडीचा आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत. थंडीच्या दिवसांत बाजारात मटार आला की मटार उसळ, मटारचा भात, पावभाजी असे पदार्थ घरोघरी आवर्जून केले जातात. पण एरवी बाहेर मिळणारी खुसखुशीत मटार करंजी आपण घरी क्वचितच ट्राय करतो. मटार स्वस्त झाले असताना घरीच चविष्ट लागणारी ही मटार करंजी घरी केली तर? मैदा, विकतचे तेल यांपेक्षा घरी केलेली करंजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने आणि भरपूर खाऊ शकतात. पाहूयात ही मटार करंजी करण्याची सोपी आणि झटपट रेसिपी. ( How to make Matar Karanji? )

(Image : Google)

साहित्य - 

१. मटार - २ वाट्या

२. कांदा - १ वाटी (बारीक चिरलेला) 

३. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा

४. लिंबाचा रस - १ चमचा 

५. धने-जीरे पावडर - अर्धा चमचा 

६. मीठ - चवीनुसार 

७. साखर - चवीनुसार 

८. कोथिंबीर - अर्धी वाटी  

९. शेव - अर्धी वाटी 

१०. मैदा किंवा गव्हाचे पीठ - २ वाट्या 

११. तेल - २ वाट्या 

 

कृती - 

१. पोळीसाठी मळतो तशी थोडी घट्टसर कणीक मळून घ्यावी.

२. मटार थोडे वाफवून हाताने किंवा रवीने ओबडधोबड बारीक करुन घ्यावेत. 

३. कढईत तेलात बारीक चिरलेला कांदा सोनेरी परतून घ्यावा.

४. मटारमध्ये परतलेला कांदा, आलं-मिरची लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, मीठ, लिंबाचा रस, साखर, बारीक शेव, चिरलेली कोथिंबीर सगळे घालून मिश्रण हाताने एकजीव करावे. 

५. कणकेचे लहान गोळे करुन त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.

६. त्यामध्ये हे मिश्रण भरुन आपण करंजीला दुमडतो तसे दुमडून फिरकीने कडा कापून घ्याव्यात.

७. कढईत तेल घालून मध्यम आचेवर करंज्या तळून घ्याव्यात. 

८. या करंज्या गरमागरम चिंचेची चटणी, सॉस किंवा नुसत्याही खायला अतिशय छान लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीभाज्याकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.