विकेंड म्हणजे आराम, फिरणे आणि छान छान खाणे. थंडीचे दिवस तर या सगळ्यासाठीच उत्तम असल्याने आपण थंडीच्या दिवसांत येणारे विकेंड कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत एन्जॉय करतो. आता दरवेळी वेगळं काय करायचं असा प्रश्नही आपल्याला पडतो. पावभाजी, मिसळ, आलु परोठे किंवा भाताचे काही वेगळे प्रकार आपण नेहमीच करतो. पण त्यापेक्षा थोडे वेगळे काही करायचे असेल तर आज आपण असाच एक पर्याय पाहणार आहोत. थंडीच्या दिवसांत बाजारात ताजे मटार मिळतात. एरवी आपण विकतचे फ्रोजन मटार किंवा घरीच साठवलेले मटार एखाद्या पदार्थासाठी वापरतो. पण थंडीत ताजे हिरवेगार मटार बाजारात येत असल्याने त्यांपासून वेगवेगळे पदार्थ या काळात आवर्जून केले जातात (Matar Paneer Paratha Recipe).
सतत पोळी भाजी किंवा मटारचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा एका स्पेशल पदार्थाची रेसिपी आपण आज पाहणार आहोत हा पदार्थ म्हणजे मटार-पनीर पराठा. भरपूर प्रोटीन असलेला हा गरमागरम पराठा पोटभरीचा आणि चविष्ट असल्याने घरातील सगळेच आवडीने खातात. कधी नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न असेल तर किंवा विकेंडला वेगळं काहीतरी हवं असेल तर हा मटार-पनीर पराठा उत्तम पर्याय ठरु शकतो. थंडीत गरम खावसं वाटत असल्याने हा हेल्दी पराठा नक्की ट्राय करुन पाहा. पाहूया या पराठ्याची सोपी रेसिपी...
साहित्य -
१. मटार - २ वाटी (सोललेले)
२. पनीर - १ वाटी (बारीक किसलेले)
३. आलं-लसूण-मिरची पेस्ट - १ ते १.५ चमचा
४. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा
५. मीठ - चवीनुसार
६. आमचूर पावडर किंवा चाट मसाला - आवडीनुसार
७. गव्हाचे पीठ किंवा मैदा - २ ते २.५ वाटी
८. तेल - पाव वाटी
९. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून एका बाजूला मळून ठेवायचा
२. मटार वाफवून, स्मॅशरने किंवा मिक्सरमध्ये स्मॅश करुन घ्यायचे.
३. मटारमध्ये किसलेले पनीर, मीठ, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि कोथिंबीर घालावी.
४. हे मिश्रण चांगले एकजीव करुन एका बाजूला त्याचे गोळे करुन ठेवावेत.
५. आलू पराठा किंवा पुरणपोळीमध्ये ज्याप्रमाणे आपण सारण भरुन पोळी लाटतो त्याचप्रमाणे पोळीच्या आवरणात सारण भरुन पराठा लाटावा.
६. तव्यावर तेल घालून हा पराठा दोन्ही बाजुने खरपूस भाजावा.
७. गरमागरम पराठा बटर, दही, सॉस किंवा लोणचे कशासोबतही अतिशय छान लागतो.