शरीराला आवश्यक पोषण देण्याची क्षमता डाळींमध्ये असते. त्यामुळेच डाळींचा समावेश रोजच्या आहारात करणं आवश्यक असतं. डाळींमधून शरीराला विकासासाठी प्रथिनं, जीवनसत्वं, फोलेट, लोह, झिंक, मॅग्नेशियम हे महत्वाचे घटक मिळतात. डाळींचा वरण-आमटी-भाजी- डोसे- खिचडी-पुलाव अशा विविध प्रकारे समावेश केला जातो. डाळींचे विविध प्रकार आहेत. पण आपल्या आहारात प्रामुख्यानं तूर, मूग आणि मसुर याच डाळींचा समावेश असतो. पण त्यामुळे पोषकतेनं समृध्द असलेल्या इतर डाळींकडे मात्र दुर्लक्ष होतं. यामुळे आपलं शरीर त्या डाळींच्या पोषण घटकांपासून् वंचित तर राहातंच शिवाय त्या डाळींच्या चवदार पदार्थांनाही आपण मुकतो. असं होवू नये यासाठी सर्व डाळी आवर्जून खायला हव्यात. अशीच एक आवर्जून खायलाच हवी अशी डाळ म्हणजे मठाची डाळ (moth bean). यालाच मटकीची डाळ असं म्हटलं जातं. मठाची डाळ म्हणजे सुपर फूड (super food moth bean) असल्याचं आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर म्हणतात. पोषणात सर्व डाळीत अव्वल असलेल्या मठाच्या डाळीचा (moth bean in diet) आहारात समावेश केल्याने आरोग्यास महत्वाचे फायदेही होतात.
Image: Google
मठाची डाळ अवश्य खावी कारण..
1. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी मठाची डाळ अवश्य खायला हवी. एक वाटी मठाची डाळ नियमित वा वरचेवर खात राहिली तर रोगप्रतिकारशक्ती वाढते.
2. कोलेस्टेराॅलचा स्तर कमी करण्यासाठी , कोलेस्टेराॅल नियंत्रित ठेवण्यासाठी मठाची डाळ खायला हवी. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी मठाची डाळ खाल्ल्यास फायदा होतो.
3. मठाच्या डाळीत फायबर आणि झिंकचं प्रमाण भरपूर असतं. स्नायू मजबूत होण्यासाठे मठाची डाळ फायदेशीर असते. मठाच्या डाळीतील फायबरमुळे पचन सुधारतं वजन कमी होतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आहारात मठाच्या डाळीचा समावेश करावा.
4. शरीराचं सर्व कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीराला ब जीवनसत्वाची गरज असते. मठाच्या डाळीत ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. मठाची डाळ आहारात असल्यास पोटही स्वच्छ राहातं.
Image: Google
मठाची डाळ कशी खावी?
1. मठाची डाळ हवाबंद डब्यात / बरणीत ठेवल्यास ती चांगली टिकून राहाते. मठाची डाळ शिजायला टाकण्यापूर्वी किंवा स्वयंपाकात वापरताना ती आधी स्वच्छ करुन धुवून 5- 6 तास पाण्यात भिजवायला हवी.
2. भिजवलेली मटकीची डाळ उकडून नंतर तिला साध्या वरणाप्रमाणे तूप, जिरे, हिंग, हळदीची फोडणी देता येते. किंवा कांदा-लसूण- टमाटा घालून भाजीसारखी डाळ करता येते. किंवा मठाच्या डाळीची गोड आंबट चवीची आमटीही छान लागते.
3. डाळ घालून खिचडी करताना मठाची डाळ घालून साधी लसणाची फोडणी दिलेली खिचडी किंवा मसाला खिचडी करता येते.
4. मठाची डाळ भिजवून , वाटून ,त्यात मसाला घालून मठाच्या डाळीच्या सारणाचे पराठे किंवा पुऱ्याही करता येतात.
Image: Google
5. मठाच्या डाळीचा पुलाव केवळ चविष्टच लागतो असं नाही तर तो गुणानंही पौष्टिक असतो.
6. भिजवलेली मठाची डाळ थोडी उकडून त्यात वरुन तिखट, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून स्प्राउटस सारखी खाता येते.
7. मुगाच्या डाळीसारखंच मठाच्या डाळीचं पौष्टिक सूपही तयार करता येतं. या सूपमध्ये आपल्याला आवडणाऱ्या भाज्यांचा समावेश करता येतो.
8. ढेमसं, दोडकं, भोपळा या भाज्या डाळ घालूनही करता येतात. तेव्हा मूग किंवा हरभरा डाळीच्या ऐवजी मठाची डाळ भिजवून ती भाज्यांना घातल्यास भाज्या चविष्ट आणि पौष्टिक होतात.