थंडीच्या दिवसांत भरपूर भूक लागते आणि खाल्लेलं छान पचतंही. त्यामुळे या काळात आपण वेगवेगळे पदार्थ आवर्जून खाऊ शकतो. थंडीत हवेत कोरडेपणा असल्याने थोडे तेलकट खाल्लेलेही चालते आणि हवेत गारठा असल्याने आपल्याला सतत काहीतरी गरमागरम खावसं वाटत असतं. अशावेळी सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर मेदू वडा किंवा उडीद वडा हा उत्तम पर्याय ठरु शकतो (Medu Vade Udid Vade Easy Recipe and Tricks).
उडदाच्या डाळीपासून केला जाणारा आणि अगदी झटपट होणारा हा वडा-सांबारचा बेत करायचा तर त्यासाठी पुरेशी तयारी हवी. हे वडे करायला सोपे वाटत असले तरी काही वेळा वड्याचे पीठ खूप घट्ट झाल्याने वडा कडक होतो. तर कधी हे पीठ जास्त पातळ झाल्याने वडे तेलात टाकल्यावर फुटतात. पाहूया परफेक्ट मापात परफेक्ट वडे होण्यासाठी सोप्या ट्रीक्स .
१. संध्याकाळसाठी वडे करायचे असतील तर केवळ ३ तास आधी १ वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ पाण्यात भिजत घालायचे.
२. ही डाळ बरीच फुगत असल्याने यामध्ये मध्यम आकाराचे साधारण २० ते २५ वडे होतात.
३. सगळे पाणी काढून टाकून ही डाळ मिक्सरमध्ये चांगली बारीक फुरवून घ्यायची. डाळ मिक्सर करताना प्रत्येक वेळी अगदी कमी पाणी घालायचे जेणेकरुन पीठ चांगले घट्टसर राहील.
४. उडीद डाळ भिजवल्यावर आणि मिक्सर केल्यावर थोडी चिकट होते. वडे हलके होण्यासाठी त्यामध्ये आपण मूगाची डाळ घालतो.
५. मिक्सर केल्यानंतर हे पीठ पुन्हा ठेवून देण्याची आवश्यकता नसते.
६. या पीठात मीठ आणि जीरे घालून कढईत तेल घालून वडे खरपूस तळून घ्यायचे.
७. गरमागरम वड्यांबरोबर आवडीनुसार सांबार किंवा खोबऱ्याची हिरवी चटणी अतिशय छान लागते.
८.. आवडीनुसार वड्यांमध्ये खोबऱ्याचे काप, मिरचीचे तुकडे घालू शकतो.