Lokmat Sakhi >Food > थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी करा अर्ध्या तासात होणारे 3 पार्टी स्पेशल पुलाव, पार्टी होईल मस्त

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी करा अर्ध्या तासात होणारे 3 पार्टी स्पेशल पुलाव, पार्टी होईल मस्त

Menu for 31st Celebration : थर्टी फर्स्ट घरीच साजरा करणार तर पार्टी मेन्यू हवा सुटसुटीत, सोपा,झटपट होणारा तरीही स्पेशल. मग पुलावाच्या या 3 प्रकारातला एक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 06:24 PM2021-12-30T18:24:55+5:302021-12-30T18:38:41+5:30

Menu for 31st Celebration : थर्टी फर्स्ट घरीच साजरा करणार तर पार्टी मेन्यू हवा सुटसुटीत, सोपा,झटपट होणारा तरीही स्पेशल. मग पुलावाच्या या 3 प्रकारातला एक करा!

Menu for 31st Celebration : For the Thirty First party, do 3 party special Pulav rice in just half an hour | थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी करा अर्ध्या तासात होणारे 3 पार्टी स्पेशल पुलाव, पार्टी होईल मस्त

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी करा अर्ध्या तासात होणारे 3 पार्टी स्पेशल पुलाव, पार्टी होईल मस्त

Highlightsसंत्र्याचा पुलाव करताना संत्र्याची चव लागण्यासाठी तांदळाच्या प्रमाणाइतकाच संत्र्याचा रस घ्यावा. पुलाव करताना तेलापेक्षाही तूप, लोणी आणि बटरचा उपयोग करावा. स्वाद छान येतो.पुलावात स्वादापुरतीच अख्खे आणि पावडर मसाले घालावेत. नाहीतर पुलाव केवळ मसालेदार लागतो.

Menu for 31st Celebration :  थर्टी फर्स्ट म्हटलं ,की सोबत पार्टी हा शब्द येतोच. बाहेर जाऊन गोंधळात पार्टी करण्यापेक्षा घरीच निवांत आपल्या लोकांसोबत चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत, मनमोकळ्या गप्पा मारत थर्टी फर्स्ट साजरा करण्याची बातच न्यारी. घरी साजरा केलेला थर्टी फर्स्ट कायम आठवणीत राहावा यासाठी मेन्यूही विशेष हवा. पदार्थांची गर्दी नको आणि ते करता करता नकोसा होणारा जीवही नको. त्यापेक्षा एकच पदार्थ असा दणदणीत करायचा की त्याची आठवण कायम राहायला हवी.  स्पेशल काय करायचं  ते चविष्ट हवं, पोटभरीचं हवं आणि पौष्टिकही हवं.  या तिन्ही गरजा पूर्ण करणारा  पर्याय म्हणजे पुलाव किंवा बिर्याणी. पण विशेष प्रसंगासाठी पुलावाचा रंग, चव, सुवास सर्वच काही स्पेशल हवं. यासाठी तीन प्रकारचे पुलाव आहेत. वाचा आणि लगेच तयारीला लागा.

Image: Google

ऑरेंज पुलाव

ऑरेंज पुलाव करण्यासाठी 200 ग्रॅम तांदूळ, 200मि.ली संत्र्याचा रस,  2 मोठे वेलदोडे, 1 टुकडा दालचिनी,  2 उभे कापलेले कांदे, 2 मोठे चमचे बटर/घरचं लोणी, 2 मिरच्या मोठ्या तुकडे केलेल्या, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा इंच संत्र्याचं साल किसून घेतलेलं आणि मीठ घ्यावं. 

ऑरेंज पुलाव करताना तांदूळ धुवून 15  मिनिटं भिजवावेत. कढईत लोणी / बटर गरम करुन त्यात आलं लसूण पेस्ट घालावी आणि परतून घ्यावी.  नंतर वेलदोडे,  दालचिनी, कांदा आणि हिरवी मिरची घालून ते परतून घ्यावे. कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की त्यात भिजवून, निथळून घेतलेले तांदूळ घालावेत. संत्र्याचा रस आणि 1 ग्लास पाणी घालावं. हे चांगलं मिसळून घ्यावं. मग यात चवीपुरतं मीठ घालावं आणि झाकण ठेवून मंद आचेवर पुलाव शिजू द्यावा. पुलाव शिजला की गॅस बंद करुन  तयार पुलावावर संत्र्याचं साल किसून घालावं आणि कढई पुन्हा झाकून ठेवावी.  हा पुलाव करायला केवळ अर्धा तास लागतो.

Image: Google

काश्मिरी पुलाव

काश्मिरी पुलाव करण्यासाठी 150 ग्रॅम तांदूळ, 8-10 केशर काड्या, 1 मोठा चमचा काजू, 1 मोठा चमचा बदाम (साल काढलेले) ,1 मोठा चमचा बेदाणे,  4 मोठे चमचे साजूक तूप, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे, 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा चमचा सूंठ पावडर, 1 वेलची, 2 लवंगा, 1 चक्रफूल, 1 छोटा तुकडा दालचिनी, 1 छोटा चमचा साखर, 2 मोठे चमचे दूध आणि  चवीनुसार मीठ घ्यावं. 

काश्मिरी पुलाव करताना आधी तांदूळ चांगले धुवावेत आणि 20 मिनिटं भिजवावेत. कढईत तूप गरम करुन त्यात जिरे, हिंग, चक्रफुल, लवंग, वेलची आणि दालचिनीचा तुकडा घालून ते परतून् घ्यावं. नंतर धुवून निथळून ठेवलेले तांदूळ घालून  ते हलकेसे परतावेत. लगेच साखर, सूंठ पावडर आणि धने पावडर टाकून 5 मिनिटं परतावं.  जेवढे तांदूळ घेतले त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घ्यावं. ते गरम करुन घालावं. मग कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर तांदूळ शिजू द्यावेत.  
एका दुसऱ्या कढईत थोडं तूप घेऊन ते गरम करावं. त्यात अख्खे काजू, बदाम घालावेत आणि परतून घ्यावेत. ते परतले की बाजूला काढावेत. त्याच तुपात बेदाणे आणि कांदा परतून घ्यावा. हे परतलेलं जिन्नस पुलाव शिजला की त्यात घालून पुलावामधे मिसळून घ्यावं. उत्कृष्ट चवीचा काश्मिरी पुलाव अवघ्या अर्ध्या तासात तयार होतो. 

Image: Google

सुल्ताना पुलाव

सुल्ताना पुलाव तयार करण्यासाठी 150 ग्रॅम तांदूळ, 2 मोठे चमचे काजू, 1 मोठी वेलची, 2 लवंगा, 1 तुकडा दालचिनी, 1 मोठा चमचा बेदाणे, 1 मोठा चमचा मनुके, 1 छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, 3 हिरव्या मिरच्या लांबसर कापलेल्या, 4 कांदे उभे बारीक चिरलेले, 4 मोठे चमचे तूप,  15-20 पुदिन्याची पानं आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 

सुल्ताना पुलाव करताना  तांदूळ धुवून 20 मिनिटं भिजत घालावेत. कढईत तूप तापवून त्यात काजू, वेलची, लवंग आणि दालचिनी घालून ते परतून घ्यावे. नंतर काजू, बेदाणे, मनुके घालून् ते परतावेत. सर्व जिन्नस चांगलं परतलं गेलं की भिजवून निथळलेले तांदूळ, आलं, गरम मसाला आणि मीठ घालून् हे सर्व नीट परतून घ्यावं. जेवढा तांदूळ घेतला त्यापेक्षा थोडं जास्त पाणी गरम करुन घालावं. पुन्हा एकदा चमच्यानं हलवून कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर पुलाव शिजू द्यावा. तांदूळ शिजले की पुलाव बुडापासून् वरपर्यंत नीट हलवून घ्यावा. 

दुसऱ्या कढईत तूप गरम करुन त्यात कांदा कुरकुरीत परतून घ्यावा. पुलाव खाण्यास घेण्याआधी हा कुरकुरीत कांदा  आणि पुदिन्याची पानं चिरुन पुलावावर पसरवून टाकावीत. हा सुल्ताना पुलाव करायला फक्त 20-25 मिनिटं लागतात. 

Image: Google

हे तिन्ही प्रकारचे पुलाव करताना तांदूळ खास पुलाव-बिर्याणीसाठी मिळतो तोच घ्यावा. पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं. जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी घ्यावं. पुलाव शिजायला घातलं जाणारं पाणी गरम असावं, थंड पाण्यानं पुलावाची चव जाते.

https://www.lokmat.com/sakhi/food/season-freshly-green-peas-make-spicy-green-peas-raita-delicious-celebration-winter-a300/

पुलाव करताना कढई किंवा पातेलं मोठं घ्यावं. म्हणजे तांदूळ शिजला की तो फुलून यायला अडचण येत नाही.  स्वाद यावा म्हणून अख्खे मसाले किंवा मसाल्याची पावडर जास्त घालू नये. मसालेदार पुलावामुळे पुलावाची नैसर्गिक चव हरवून जाते. असे पुलाव खाल्ले की मग पोटात, छातीत जळजळही होते. या कोणत्याही पुलावाबरोबर आपल्या आवडीचा रायता करुन खावा. सध्या हिरव्या मटारचा सिझन आहे. लुसलुशीत मटारचा चटपटीत रायता पुलावासोबत मजा आणतो. 


 

Web Title: Menu for 31st Celebration : For the Thirty First party, do 3 party special Pulav rice in just half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.