Join us  

हिरव्यागार कैरीचा करा आंबट-गोड मेथांबा, जेवणाची रंगत वाढवणारी सोपी-झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 11:31 AM

Methamba Recipe of Kairi Raw Mango : उन्हाळ्यात तोंडाला चव नसेल तर आवर्जून करा

आपल्या रोजच्या जेवणात पोळी-भाजी असली तरी आपल्याला तोंडी लावायला चटणी, लोणचं असं काही ना काही लागतंच. तोंडाला चव येण्यासाठी आणि जेवणाची रंगत वाढण्यासाठी ताटाची डावी बाजू अतिशय महत्त्वाची असते. थंडीच्या दिवसांत आपण आवळा, ओली हळद, मिश्र भाज्या, लिंबू यांची लोणची करतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात कैऱ्या मोठ्या प्रमाणात येत असल्याने कैरीचे वेगवेगळे प्रकार या दरम्यान तोंडी लावण्यासाठी आवर्जून केले जातात. यामध्ये तक्कू म्हणजेच कैरीचे ताजे लोणचे, कैरीचा गुळांबा, मेथांबा असे बरेच प्रकार केले जातात. मेथांबा म्हणजे मेथ्या घालून केले जाणारे लोणचे. कैरीची आंबट चव, त्यात गुळाचा गोडवा आणि मेथी, जिऱ्याची फोडणी यामुळे या मेथांब्याला अतिशय छान असा स्वाद येतो आणि जेवणाची रंगत वाढते (Methamba Recipe of Kairi Raw Mango). 

(Image : Google)

साहित्य - 

१. कैऱ्या - २ ते ३ 

२. तेल - २ चमचे 

३. मोहरी - अर्धा चमचा

४. हिंग - पाव चमचा

५. हळद - अर्धा चमचा

६. तिखट - अर्धा चमचा

 

७. मीठ - अर्धा चमचा

८. गूळ - १ ते १.५ वाटी

९.मेथ्या - १ चमचा 

कृती - 

१. कैरीची साले काढून त्याच्या बारीक फोडी करुन घ्यायच्या. 

२. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी तडतडली की हिंग हळद घालायचे

३. या फोडणीत मेथ्या घालून त्या चांगल्या परतून घ्यायच्या, त्यात तिखट घालायचे.

४. कैरीचे काप या फोडणीत घालून त्यावर मीठ घालून सगळे एकत्र हलवून घ्यायचे.

५. पाव कप पाणी घालून हे सगळे झाकण ठेवून शिजवायचे, त्यामुळे मेथ्यांचा फ्लेवर उतरतो. 

६. ७ ते ८ मिनीटांनी झाकण काढल्यावर कैरी मऊ झालेली असेल. त्यामध्ये गूळ घालायचा आणि सगळे पुन्हा एकजीव करायचे. 

७. गुळ हळूहळू यामध्ये वितळतो आणि छान एकजीव होतो. 

८. पुन्हा ४ ते ५ मिनीटे झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा.

९. मेथ्या चवीला कडवट असल्या तरी त्य़ा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

१०. हा आंबट-गोड थोडासा तिखट मेथांबा जेवणाची लज्जत वाढवतो यात वादच नाही. 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.