Join us  

थंडीत सारखं गरमागरम काय करायचं असा प्रश्न आहे? करा टेस्टी मेथी मटार मलाई; घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 3:40 PM

Methi Matar Malai Recipe by Chef Kunal Kapoor : मेथी मटार मलाईसारखी एखादी पंजाबी स्टाईल भाजी केली तर जेवण नक्कीच चार घास जास्त जातं.

ठळक मुद्देत्याच त्या भाज्या खाऊन कंटाळलात तर ट्राय करा ही हटके रेसिपीथंडीच्या दिवसांत मटार भरपूर येत असल्याने चटपटीत आणि हेल्दी अशी ही भाजी असेल तर जेवण नक्कीच जास्त जाईल

थंडीच्या दिवसांत आपल्याला सतत गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. अशावेळी कोरड्या फळभाज्या आणि पोळी किंवा भाकरी तर अजिबात नको होते. सतत सूप आणि गरम वेगळं काहीतरी करणं शक्य होतंच असं नाही. अशावेळी एखादी छानशी वेगळी भाजी केली तर जेवण जातं. थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात. तसंच या काळात बाजारात मटारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. अशावेळी मेथी मटार मलाईसारखी एखादी पंजाबी स्टाईल भाजी केली तर जेवण नक्कीच चार घास जास्त जातं. थंडीच्या दिवसांत आपल्याला जास्त भूक लागते. तसेच या काळात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अशावेळी नेहमीपेक्षा वेगळी अशी चविष्ट भाजी केली तर घरातील सगळेच खूश होतात. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी नुकतीच ही रेसिपी शेअर केली असून ती कशी करायची पाहूया (Methi Matar Malai Recipe by Chef Kunal Kapoor)...

(Image : Google)

साहित्य - 

१. मेथी - १ ते १.५ वाटी

२. मटार - १ वाटी

३. वाळलेली मेथीची पाने - अर्धी वाटी 

४. तेल - ४ चमचे 

५. बटर - २ चमचे 

६. शाही जीरे - १ चमचा 

७. वेलची - ४

८. काळी वेलची - ४ 

९. दालचिनी - १ लहान तुकडा 

१०. दही - १ वाटी 

११. कांदे - ३ 

१२. काजू - १० ते १२ 

१३. मिरची - २ 

१४. आलं-लसूण - १ चमचा 

१५. हळद - पाव चमचा 

१६. तिखट - पाव चमचा 

१७. धणे -जीरे पावडर - १ चमचा 

१८. मीठ - चवीनुसार 

१९. काळी मीरी - ४ 

कृती -

१. एका पॅनमध्ये अर्धा लीटर पाणी घेऊन त्यामध्ये कांद्याचे तुकडे, मिरची, आलं, लसूण, काळी वेलची आणि काजू घाला.

२. हे मिश्रण साधारणपणे अर्धा तास चांगले शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. 

३. पाणी गाळून इतर गोष्टी मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये दही घालून बारीक पेस्ट करुन घ्या. 

४. एका बाऊलमध्ये पाण्यात वाळलेली मेथीची पाने भिजवा.

५. एका पॅनमध्ये २ चमचे तेल, १ चमचा बटर घालून त्यामध्ये शाही जीरे, वेलची, काळी वेलची, दालचिनी, काळी मिरी, हळद, तिखट, धणे-जीरे पावडर घाला.

६. यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालून सगळे मिश्रण चांगले १५ मिनीटे शिजवून घ्या.

७. दुसऱ्या एका पॅनमध्ये तेल घालून त्यात भिजवलेली मेथी, ताजी मेथी आणि मटार घाला.

८. यामध्ये शिजवलेली ग्रेव्ही आणि फ्रेश क्रीम घालून मीठ घालून बारीक गॅसवर सगळे एकजीव करुन ५ मिनीटे शिजवा.

९. ही भाजी गरम पुऱ्या, पराठा, फुलके अशा कशासोबतही अतिशय छान लागते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर