Join us  

१० रुपयांची कोवळी हिरवीगार मेथी आणलीत, करा हिवाळा स्पेशल गरमागरम मेथी मुटके, पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 11:01 AM

Methi Mutke Breakfast Recipe : संध्याकाळी चहासोबत किंवा मुलांच्या खाऊच्या डब्यातही हे मुटके उत्तम पर्याय होतात.

ठळक मुद्देवाफवलेले मुटके ३ ते ४ दिवस टिकत असल्याने आपण पाहिजे तेव्हा ते तळून खाऊ शकतो. सारखी मेथीची भाजी, पराठे यांचा कंटाळा आल्यावर करता येईल असा चटपटीत पर्याय

थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. एरवी अगदी २०-३० रुपये भाव असणाऱ्या भाज्याही या काळात १० रुपयांना मिळतात. मेथी ही पालेभाजीमधील अतिशय पौष्टीक अशी भाजी. विविध प्रकारची व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळत असल्याने आहारात या भाजीचा समावेश अवश्य असायला हवा असे आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. मेथी म्हटल्यावर आपण एकतर भाजी करतो किंवा फारतर मेथीचे पराठे. मात्र सतत भाजी किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर ब्रेकफास्टसाठी करु शकतो असे गरमागरम मुटके हा उत्तम पर्याय असू शकतो. हेल्दी आणि पोटभरीचा पर्याय असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे मुटके आवडीने खातात. संध्याकाळी चहासोबत किंवा मुलांच्या खाऊच्या डब्यातही हे मुटके उत्तम पर्याय होतात. कोथिंबीर वडी किंवा भोपळ्याचे मुटके ज्यापद्धतीने केले जातात त्याचप्रकारे हे मुटके अतिशय चविष्ट लागतात. पाहूयात हे मुटके करायची सोपी रेसिपी (Methi Mutke Breakfast Recipe)...

साहित्य -

१. मेथी - एक मध्यम आकाराची जुडी

२. तीळ - १ चमचा

(Image : Google)

३. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा 

४. ज्वारीचे पीठ - १ वाटी 

५. बेसन - अर्धी वाटी 

६. तिखट - अर्धा चमचा 

७. आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा

८. मीठ - चवीनुसार 

९. तेल - २ वाट्या 

१०. हिंग - पाव चमचा 

११. हळद - अर्धा चमचा 

कृती - 

१. मेथी निवड़ून स्वच्छ धुवून तेलात थोडी परतून घ्यायची.

 

२. परतलेली मेथी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात ज्वारीचे पीठ आणि बेसन घालायचे. याऐवजी आपण थालिपीठाची भाजणीही घालू शकतो. 

३. यामध्ये हिंग, हळद, तिखट, धणे-जीरे पावडर, तीळ, मीठ, आलं-लसूण पेस्ट सगळे घालून चांगले पीठ मळावे. 

४. याचे हातानेच बारीक मुटके करावेत.

५. गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे आणि त्यावर एखादी चाळणी ठेवून हे मुटके वाफवायला ठेवावेत. 

६. वाफवल्यावर ते थोडे गार होऊ द्यावेत आणि मग तेलात तळावेत.

७. हे गरमागरम मुटके दही, सॉस, हिरवी चटणी यांच्यासोबत किंवा नुसतेही छान लागतात. 

८. वाफवलेले मुटके ३ ते ४ दिवस टिकत असल्याने आपण पाहिजे तेव्हा ते तळून खाऊ शकतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.