Join us  

करा स्टफ पराठा सँडविच, मेथीच्या शिळ्या पराठ्यांचा अप्रतिम पौष्टिक पदा‌र्थ-रेसिपीही सोपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 4:42 PM

Methi Paratha Stuffed Sandwich Recipe : शिळे गार पराठे नको म्हणून नाक मुरडणाऱ्यांना द्या त्याच पराठ्यांचा खास पौष्टिक पदार्थ.

बाजारांत मेथी चांगली हिरवीगार मिळाली की आपण हमखास बाजारांतून मेथी विकत आणतो. मेथीच्या भाजी शिवाय मेथीचे पराठे, मेथीचे मुटके असे मेथीचे अनेक पदार्थ आपण बनवतो. मेथी हे पालेभाज्यातील महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. मेथीचा वापर आपण पालेभाजी म्हणून तर करतोच त्याचबरोबर मेथीचा औषध म्हणून देखील वापर केला जातो. मेथीचे अनेक पदार्थ बनविले जातात. ते खायला सुद्धा खूप छान लागतात.  

मेथीचे पराठे हा बहुदा सगळ्याच घरांत किमान आठवड्यातून एकदातरी होणारा असा पदार्थ आहे. मेथीचे पराठे बनवले की घरांतील सगळेच हा पदार्थ आवडीने खातात. मेथीचे पराठे बनविले की सहसा ते उरत नाहीत. परंतु कधी जास्तीचे पराठे उरलेच तर त्याच काय करायचं असा प्रश्न सगळ्याच गृहिणींना पडतो. मेथीचे पराठे उरलेच तर आपण त्याचे झटपट स्टफ पराठा सँडविच तयार करु शकतो. हे स्टफ पराठा सँडविच आपण संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेसाठी सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतो. उरलेल्या पराठ्यांपासून स्टफ पराठा सँडविच बनविण्याची झटपट सोपी रेसिपी(Methi Paratha Stuffed Sandwich Recipe).      

साहित्य :- 

१. कांदा - १/४ कप (बारीक चिरलेला)२. ढोबळी मिरची - १/४ कप (बारीक चिरलेली)३. कोबी - १/४ कप (बारीक चिरलेला)४. पिझ्झा सॉस - १/४ कप५. चीज - १/२ कप (बारीक किसून घेतलेले)६. मेयॉनीज - ५ टेबलस्पून ७. चिलीफ्लेक्स - २ टेबलस्पून८. मिक्स हर्ब्स - २ टेबलस्पून९. फ्रेश क्रिम - १ टेबलस्पून१०. मीठ - चवीनुसार ११. मेथीचे पराठे - ८ ते १० 

 

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये बारीक चिरुन घेतलेले कांदा, कोबी, ढोबळी मिरची घ्यावी आता त्यात पिझ्झा सॉस व बारीक किसून घेतलेले चीज घालावे. २. आता या मिश्रणांत मेयॉनीज, चिलीफ्लेक्स, मिक्स हर्ब्स, फ्रेश क्रिम, चवीनुसार मीठ घालून हे सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. ३. त्यानंतर एक तयार मेथीचा पराठा घेऊन त्यावर हे भाज्यांचे तयार केलेले स्टफिंग सर्वत्र पसरवून घ्यावे. आता हे मिश्रण पसरवून झाल्यानंतर त्यावर दुसरा मेथीचा पराठा ठेवावा. ४. या तयार झालेल्या स्टफ पराठा सँडविच वर बारीक किसलेले चीज वरुन घालावे. आता या स्टफ पराठा सँडविचचे त्रिकोणी आकारांत तुकडे कापून घ्यावे. 

स्टफ पराठा सँडविच खाण्यासाठी तयार आहे. हे स्टफ पराठा सँडविच हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृती