सारखी भाजी-पोळी किंवा आमटी-भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो. थंडीच्या दिवसांत तर आपल्याला सतत गरमागरम काहीतरी ताटात असावं असं वाटतं. थंडीच्या काळात बाजारात भाजीपाला भरपूर प्रमाणात असतो. या काळात चांगली भूक तर लागतेच पण खाल्लेले चांगले पचतेही. त्यामुळे या काळात शक्य तितके पौष्टीक खायला हवे. मेथीची भाजी म्हटली की आपण ती परतून करतो किंवा मेथीचे पराठे करतो (Methi Pithla Authentic Recipe).
पण ग्रामीण भागात आवर्जून केले जाणारे मेथीचं पिठलं अतिशय चविष्ट लागतं. यावर लसणाची फोडणी दिल्याने त्याचा स्वाद आणखीनच वाढतो. गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत हे पिठलं अतिशय छान लागतं. भातासोबतही हे पिठलं फार छानलागतं. सोबत मिरचीचा ठेचा, कांदा असला की एकदम गावरान मेन्यू तयार. तेव्हा रोजच्या त्याच त्या पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा गावरान मेन्यू नक्की ट्राय करा.
साहित्य -
१. मेथी - अर्धी जुडी
२. बेसन - १ वाटी
३. लसूण पाकळ्या - ८ ते १०
४. तेल - १ चमचा
५. मोहरी, जीरं - अर्धा चमचा
६. हळद-हिंग - पाव चमचा
७. तिखट - पाव चमचा
८. मीठ - चवीनुसार
कृती -
१. मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्या. शक्यतो चिरू नका कारण चिरल्यानंतर मेथी जास्त कडू लागते.
२. एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात पाणी घालून त्यातील गुठळ्या मोडून एकसारखे करा.
३. बेसनामध्येच मीठ, तिखट घालून घ्या.
४. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जीरं घालून ते चांगलं तडतडू द्या.
५. त्यानंतर हिंग आणि हळद घालून लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे किंवा ठेचून घाला.
६. मग यात मेथी घालून ती चांगली परतून घ्या.
७. यामध्ये बेसनाचे मिश्रण घालून चांगली उकळी येऊद्या
८. मग ५ मिनीटे बारीक गॅसवर पिठलं शिजू द्या
९. हे गरमागरम पिठलं पोळी, भाकर, भात कशासोबतही खाऊ शकता.