Join us  

सारखी पोळी-भाजी नको वाटते? ट्राय करा परफेक्ट गुजराती मेथी थेपला, पोटभरीचा पौष्टिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 6:08 PM

Methi Thepla Recipe : नाश्ता नाहीतर जेवणाला करता येईल किंवा ट्रिपला जातानाही सोबत ठेवता येईल असा हा प्रकार नेमका कसा बनवायचा ते पाहूया...

सारखी पोळी भाजी खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी आपण कधी भाकरी, कधी पुऱ्या किंवा पराठे असे थोडे वेगळे प्रकार करतो. काहीवेळा नाश्त्याला किंवा कुठे ट्रिपला जातानाही आपण पराठा, पुऱ्या, थेपला हे प्रकार सोबत घेतो. म्हणजे ऐनवेळी भूक लागली तर घरी तयार केलेले आणि पोटभरीचे असलेले हे प्रकार खाता येतात. पराठे किंवा पुऱ्या सामान्यपणे केल्या जातात. पण थेपला हा खास गुजराती प्रकार असून तो अतिशय चविष्ट असतो. गुजराती पदार्थांमध्ये खाकरा, खमन, पापडी हे प्रकार जसे प्रसिद्ध असतात तसेच थेपला ही गुजराती लोकांची खासियत आहे. नाश्ता नाहीतर जेवणाला करता येईल किंवा ट्रिपला जातानाही सोबत ठेवता येईल असा हा प्रकार नेमका कसा बनवायचा ते पाहूया (Methi Thepla Recipe)...

साहित्य -

१. गव्हाचं पीठ - २ वाट्या

२. ज्वारी पीठ - २ वाट्या 

३. बेसन - १ वाटी

(Image : Google)

४. दही - २ वाट्या 

५. मेथी - २ वाट्या (बारीक चिरलेली)

६. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ ते १.५ चमचा 

७. ओवा - १ चमचा 

८. मीठ - चवीनुसार 

९. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा 

१०. तेल - अर्धी वाटी 

कृती - 

१. सगळी पिठे एकत्र करुन त्यामध्ये मेथी घाला.

२. यात ओवा, आलं-मिरची-लसूण पेस्ट आणि मीठ, धणे-जीरे पावडर घाला.

 

३. यात दही आणि पाणी आणि थोडे तेल घालून पीठ चांगले मळून घ्या.

४. १० मिनीटे हे पीठ चांगले मुरले की त्याचे जाडसर थेपले लाटा किंवा थापा.

५. तव्यावर तेल घालून हे थेपले दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.